महाराष्ट्र । विशेष प्रतिनिधी । दि.२७ एप्रिल । आज कोरोनाच्या आढावा बैठकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल-डिझेलवरील व्हॅटवरून महाराष्ट्रासह इतर काही राज्यांना कर कमी करण्याचे आवाहन केले. भाजपशासित राज्ये सोडली तर इतर राज्यांनी कर कमी न केल्यामुळेच पेट्रोल-डिझेलचे दर वाढलेले असल्याचे मोदी म्हटले होते. याच मुद्द्यावर आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे. महाराष्ट्रासारख्या देशाच्या विकासात सर्वात मोठे योगदान देणाऱ्या राज्याला आर्थिक बाबतीत सापत्न वागणूक दिली जात असल्याचा आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे. आजही जीएसटीचे 26 हजार कोटी केंद्राकडे थकले असल्याचेही त्यांनी सांगितलं. नागरिकांना वस्तुस्थिती कळावी म्हणून हे स्पष्ट करणे आवश्यक आहे, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
काय म्हणाले होते मोदी?
देशातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी ऑनलाइन बैठक घेतली. या बैठकीत मोदींनी देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींवरून राज्यांना त्यांचा व्हॅट कमी करण्याचे आवाहन केले आहे. पेट्रोल-डिझेलवरच्या टॅक्समुळे राज्याच्या तिजोरीत भर पडत असली तरी त्यामुळे नागरिकांच्या खिशावर अतिरिक्त ताण येत आहे. पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीचा बोजा कमी करण्यासाठी केंद्र सरकारने उत्पादन शुल्क नोव्हेंबर महिन्यात कमी केले होते. राज्य सरकारांनीही कर कमी करावेत, असे आवाहन करण्यात आले होते. पण, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, तेलंगाना, आंध्र प्रदेश, केरळ, झारखंड, तामिळनाडू या राज्यांनी केंद्र सरकारचं ऐकले नाही. त्यामुळं त्या राज्यातील नागरिकांना महाग पेट्रोल आणि डिझेल खरेदी करावे लागत आहे. देशातील सर्व राज्यांनी गुजरात आणि कर्नाटकप्रमाणे इंधनावरील व्हॅट कमी करून नागरिकांना दिलासा द्या, असे ते म्हणाले. तसेच यावेळी त्यांनी देशभरातील सर्व राज्यांमधील पेट्रोल-डिझेलच्या दरांची तुलना केली