देशात 15 राज्यांमध्ये भारनियमन; महाराष्ट्रास 7 दिवसांपासून दिलासा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२८ एप्रिल । कोळसा टंचाई व इतर कारणांमुळे देशव्यापी वीजसंकटामध्ये अनेक राज्य विजेच्या भारनियमनाला (load shedding) तोंड देत आहेत. भारनियमन करीत असलेल्या राज्यांची संख्या दोन दिवसांमध्ये १० वरून १५ वर गेली आहे. मात्र महावितरणच्या (MSEDCL) प्रभावी नियोजनाद्वारे सुरु असलेल्या उपाययोजनांमुळे राज्यातील भारनियमन पूर्णतः आटोक्यात आहे. त्यामुळे गुरुवारी (ता. २१) मध्यरात्रीपासून महावितरणने सर्वच वीजवाहिन्यांवर तसेच कृषिपंपांना वेळापत्रकानुसार दिवसा व रात्री ८ तास अखंडित व सुरळीत वीजपुरवठा केला आहे. अखंडित वीजपुरवठ्याची ही परिस्थिती बुधवारी (ता. २७) देखील कायम होती व कुठेही भारनियमन करण्यात आले नाही. (load shedding in 15 states in india Relief to Maharashtra from 7 days Nashik News)

या उलट देशातील वीज संकट अधिकच गडद झाल्याची परिस्थिती दिसून येत आहे. राष्ट्रीय भार प्रेषण केंद्राच्या आकडेवारीनुसार सोमवारी (ता. २५) देशातील राजस्थान, उत्तरप्रदेश, बिहार, हरियाना आदींसह १० राज्यांमध्ये साधारणतः ९ ते १५ टक्क्यांपर्यंत विजेची तूट असल्यामुळे विजेचे भारनियमन करावे लागले. मात्र मंगळवारी (ता. २६) विजेची तूट असलेल्या राज्यांची संख्या १० वरून १५ झाली आहे.

यामध्ये राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, हरियाना, झारखंड, पंजाब, आंध्रप्रदेश, ओरिसा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, छत्तीसगड, केरळ, आसाम, तमिळनाडू, कर्नाटक या राज्यांचा समावेश आहे. तथापि देशात सर्वाधिक २७ हजार ८३४ मेगावॉट विजेचा पुरवठा करताना महाराष्ट्रात मात्र कुठेही भारनियमन करावे लागले नाही, हे विशेष. यामध्ये मुंबई वगळून उर्वरित राज्यात महावितरणने मागणीप्रमाणे केलेल्या २३ हजार ७९४ मेगावॉट अखंडित वीज पुरवठ्याचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *