कोकण तापला ; सिंधुदुर्गात पारा ४० अंशांपर्यंत

Spread the love

Loading

महाराष्ट्र । विशेष प्रतिनिधी। दि.२९ एप्रिल । जिल्ह्यात उष्म्याचा पारा वाढला आहे. गेले दोन दिवसांत पारा ४० च्या पुढे जात आहे. अगदी आज संध्याकाळीही तापमान ३४.९ डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहचले होते. ढगाळ वातावरण असेच राहिल्यास तापमानात अधिकची वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.जिल्ह्यात वातावरणात कमालीचे बदल पाहायला मिळत आहेत. गेले आठ दिवस अधूनमधून अवकाळी पाऊस होत आहे. याला वादळी वाऱ्यांचीही जोड होती. याबरोबरच पाराही चढला आहे. गेले दोन दिवस उष्म्याचा कहर सुरू आहे. दुपारनंतर अधिक तीव्रता दिसून येते. परिणामी अंगाची लाही लाही होत असून घामाच्या धारा अंगातून वाहतात. शहरात दुपारच्या वेळेला नागरिक घरातून बाहेर पडण्याचे टाळत आहेत. शहरातील ठिकठिकाणच्या शीतपेय दुकानांमध्ये मोठी गर्दी दिसून येत आहे.

सद्यस्थितीत ढगाळ वातावरण असल्याने उष्णतेत वाढ होताना दिसत आहे. सकाळी आकाश स्वच्छ असले तरी दुपारनंतर वातावरण कमालीचे बदललेले दिसून येत आहे. रात्री उशिरापर्यंत ढगाळ वातावरण असल्याने दिवसभर तापलेली जमीन व त्यातून निर्माण होणारी उष्णता ही वातावरणातच तग धरून राहते. परिणामी या उष्णतेचा त्रास मोठ्या प्रमाणात सहन करावा लागतो. आकाश स्वच्छ असल्यास तापलेल्या जमिनीतील उष्णता निघून जाते. त्यामुळे उष्णतेची तीव्रता तितकीशी भासत नाही. मात्र, जिल्ह्यात असलेल्या सध्याच्या दमट वातावरणामुळे तापमानात वाढ पाहायला मिळत आहे. पारा ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोचत आहे. अगदी संध्याकाळीही वातावरणात उष्मा टिकून असतो. यामुळे जिल्हावासीय हैराण झाले आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *