उत्तर, मध्य भारतात पाच दिवस उष्णतेची भीषण लाट, महाराष्ट्रात यलो-ऑरेंज अलर्ट ; हवामान विभागाचा इशारा

Spread the love

महाराष्ट्र । विशेष प्रतिनिधी। दि.२८ एप्रिल । पुढील काही दिवस महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये उष्णतेची भीषण लाट राहणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. उत्तर, पश्चिम आणि मध्य भारतात ही लाट राहील. ईशान्य भारतही या काळात तापलेला राहील. दरम्यान, वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात, विशेषत: विदर्भात यलो व ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

गुरुवारी हवामान विभागाने जाहीर केलेल्या अंदाजानुसार, विदर्भ, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली आणि राजस्थानात पाच दिवस उष्णतेची लाट राहील. बिहार, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, पश्चिम बंगाल आणि तेलंगणातही लाटेची शक्यता आहे. या राज्यातील अनेक ठिकाणी दिवसाचे तापमान ४५ अंश सेल्सियसपर्यंत वाढू शकते.

दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पावसाचे सावट असून सांगली आणि सातारा जिल्ह्यात ठिकठिकाणी विजांच्या कडकडाटासह ३० ते ४० प्रतितास वेगाने वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

देशभरात अनेक शहरांत तापमान गाठेल ४५ अंशांचा टप्पा
गुरुवारी तापमान ४० अंशांपार
चंद्रपूर ४५.८ अंश, जळगाव ४५.६, अकोला ४५.४, नंदुरबार ४५.२, ब्रह्मपुरी ४५.२, वर्धा ४५.१, यवतमाळ ४४.७, अहमदनगर ४४.५, अमरावती ४४.४. नागपूर ४४.३, परभणी ४३.८, सोलापूर ४३.४, मालेगाव ४३.४, वाशिम ४३.०, जेऊर ४३.०, गडचिरोली ४२.८, जालना ४२.६,औरंगाबाद ४२.४ अंश.

अकोल्यात ऑरेंज अलर्ट जारी नागपूर जिल्ह्यात यलो अलर्ट देण्यात आला असून वर्धा, चंद्रपूर, अकोला, यवतमाळ या जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

ग्रीन अलर्ट म्हणजे… : कोणतीही वॉर्निंग नाही. परिस्थिती सामान्य राहील.
यलो अलर्ट : हवामानातील बदलांकडे सातत्याने लक्ष ठेवून सावध राहणे योग्य.
ऑरेंज अलर्ट : नैसर्गिक आपत्तीचा इशारा, लोकांनी अतिसावध राहण्याची गरज.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *