महाराष्ट्र २४- ऑनलाईन – मुंबई : ठाण्यातील काही तरुण सोमवारी मजुरांच्या छावण्यांमध्ये अन्नवाटपासाठी गेले होते. एका मजुराने विनंती केल्यामुळे त्याच्या मोबाइलचे सिमकार्ड एका तरुणाने आॅनलाइन रिचार्ज करून दिले. ही बातमी छावणीत पसरल्यानंतर अनेकांनी फूड पॅकेट सोडून या तरुणालाच गराडा घातला. मोबाइल बंद पडल्याने गावी संपर्क तुटला आहे. अन्न खूप जण देतात. तुम्ही मोबाइल रिचार्ज करून दिला तर उपकार होतील, अशी विनवणी हे मजूर करत होते.
कोरोनाचे संकट कोसळल्यानंतर भीतीपोटी अनेक परप्रांतीय मजूर आपल्या गावांकडे निघाले होते. त्यांना सरकारने वेगवेगळ्या छावण्यांमध्ये रोखून ठेवले आहे. तिथे त्यांना अन्न दिले जाते. आरोग्य तपासणी होते. सुरक्षेसाठी मास्कही मिळतात. मात्र, सोमवारी घडलेल्या या प्रकारानंतर मजुरांना मोबाइल रिचार्जची चिंता असल्याचे निदर्शनास आले. बहुतांश मजूर प्री पेड पद्धतीने १४ किंवा २१ दिवसांचे रिचार्ज करत असतात. २१ मार्चला लॉकडाउन झाल्यापासून रिचार्ज करणाऱ्या दुकानांचे शटर डाउन आहे. मजुरांकडे क्रेडिट-डेबिट कार्ड किंवा गुगल पे सारखे पर्याय नाही. आॅनलाइन रिचार्ज करता येत नसल्याने अनेकांचे फोन बंद झाले आहेत. या संकटकाळात परराज्यात असलेल्या कुटुंबाशी संपर्क तुटल्यामुळे ते अस्वस्थ झालेले दिसतात. केवळ मजूरच नाही, अनेक गरिबांच्या वस्त्यांमध्ये मोबाइल रिचार्जची ही समस्या भेडसावत असल्याची माहिती हाती आली आहे.