महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी। दि.१ मे। भारतीय हवामान विभागाकडून ( heat wave april 2022 ) कुलाबा येथील सन २०११पासून, तर सांताक्रूझ येथील २०१७पासून उपलब्ध माहितीनुसार २०२२मध्ये कुलाबा येथे १७ दिवस कमाल तापमानाचा पारा ३४ किंवा त्यापुढे होता. तर, सांताक्रूझ येथे १६ दिवस ३४ किंवा त्यापुढे तापमानाचा पारा गेला होता. ३८हून जास्त तापमान दोन वेळा होते. सन १९८१ ते २०१० या कालावधीतील उपलब्ध माहितीनुसार, एप्रिलमध्ये मुंबईचे सरासरी तापमान हे ३३.२ अंश सेल्सिअस इतके असते.
गेल्या १० वर्षांमधील एप्रिल महिन्यातील कुलाबा येथील तापमानाचा आढावा घेतला तर कुलाबा येथे या आधी सन २०१३ मध्ये ३७.६ अंश सर्वाधिक तापमान नोंदले गेले होते. मात्र त्या वर्षी ३४ अंशांहून अधिक तापमान तीन वेळा होते. सर्वसाधारणपणे पारा हा ३१ ते ३२ अंशांदरम्यान होता. मात्र यंदा कुलाब्याचे सर्वाधिक तापमान ३७.२ अंश नोंदले गेले, तर १७ वेळा ३४ किंवा त्यापुढे तापमान होते. त्यातही ३५ किंवा त्यापुढे तीन वेळा होते. यंदाच्या सांताक्रूझ येथील तापमानाचा आढावा घेतला तर १६ दिवस तापमान ३४ किंवा त्याहून पुढे होते. एप्रिलच्या पहिल्या टप्प्यात चढे तापमान होते. १२ आणि १३ एप्रिलला हे तापमान ३६ अंशांच्या पुढे होते. त्यानंतर २१ एप्रिलला पारा ३८ अंशांहून पुढे पोहोचला. २८ एप्रिलपर्यंत हा पारा चढाच होता. या आठ दिवसांच्या कालावधीत तीन वेळा ३७ ते ३८ दरम्यान तापमान तर दोन वेळा ३८ अंशांहून अधिक तापमानाची नोंद झाली. या काळात आर्द्रता कमी असल्याने कोरड्या वातावरणामुळे अधिकच त्रास मुंबईकरांना जाणवला.