महागाईचा बकासुर ; व्यावसायिक LPG पुन्हा महागला

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी। दि.१ मे। नवी दिल्ली – एलपीजी गॅसच्या दरात सारखी वाढ होत असून आज परत या दरात वाढ झाली आहे. १९ किलो वजनाची गॅस टाकीसाठी आता मोठी किंंमत मोजावी लागणार आहे.व्यवसायिक एलपीजी गॅसच्या दरात 102.50 रुपयांची वाढ झाली असून 19 किलो वजनाचा गॅस सिलेंडर आता 2355.50 रुपयांना मिळणार आहे. त्यामुळे व्यवसाय करणाऱ्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. हे भाव 1 मे पासून म्हणजेच आजपासून लागू होणार आहेत.दरम्यान 19 किलोंची गॅस टाकी घेण्यासाठी अगोदर 2253 रुपये लागत होते. या भाववाढीनंतर आता यासाठी 2355.50 रुपये मोजावे लागणार आहेत. 5 किलोच्या एलपीजी गॅस टाकीसाठीही आता 655 रुपये मोजावे लागणार असून त्यामुळे घरगुती गॅससहीत व्यावसायिक गॅसमुळेही आता खिशाला कात्री लागणार आहे.

यापूर्वी 1 एप्रिल रोजी 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजीची किंमत प्रती सिलेंडर 250 रुपयांनी वाढवून 2,253 रुपये करण्यात आली होती. तर 1 मार्च रोजी व्यावसायिक एलपीजीच्या दरात 105 रुपयांची वाढ करण्यात आली होती. या वाढीनंतर आता 102.50 रुपयांची वाढ झाली असून 19 किलो वजनाचा गॅस सिलेंडर आता 2355.50 रुपयांना मिळणार आहे.

दरम्यान घरगुती गॅसच्या किंमती वारंवार वाढत असून त्यामुळे सामान्यांना फटका बसला आहे. पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या किंमती दिवसेंदिवस वाढत आहेत त्यामुळे सामान्यांना या महागाईचा सामना करावा लागत आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ करण्यात आली नसून भारतात वेगवेगळ्या भागात घरगुती गॅसचे भाव वेगवेगळे आहेत. 14 किलोच्या घरगुती विनाअनुदानित गॅससाठी 940 ते 970 रुपये मोजावे लागत आहेत. घरगुती गॅसच्या किंमती न वाढल्याने काहीसा दिलासा मिळाला असला तरी व्यवसायिक सिलेंडरसाठी आता 2355.50 रुपये मोजावे लागणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *