महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी। दि.१ मे। देशभरातील तापमानाच्या तुलनेत मे महिन्यात महाराष्ट्रात कमाल तापमान सामान्य असेल. विशेषत: मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात मे हीटचा प्रभाव कमी असेल. विदर्भात मात्र दुसऱ्या आठवड्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता असून अधूनमधून तीन आठवड्यांपर्यंत राज्यावर पूर्वमोसमी पावसाचे ढग राहतील. त्यामुळे राज्यातील कमाल तापमान सरासरीच्या जवळ राहील, असा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून ३० एप्रिल रोजी वर्तवण्यात आला.
औरंगाबादसह जळगावात उष्णतेची लाट तीव्र आहे. सलग ३ दिवसांपासून कमाल तापमान ४४ अंशांपुढे आहे. शनिवारी तापमान ४४.३ अंशांच्या उच्चांकावर हाेते. रात्रीचे तापमान ३० अंशांवर हाेते. औरंगाबादेत रात्रीचे तापमान तिशीपुढे गेल्याने पहाटेचा गारठा गायब झाला.
हवामान विभागाने शनिवारी देशभरात मे महिन्यात हवामानाची काय स्थिती असेल याचा मासिक अंदाज जाहीर केला. त्यानुसार महाराष्ट्रात तापमान एप्रिलच्या तुलनेत सामान्य असेल, असा दिलासा मिळतो आहे.
राज्यातील काही शहरांतील तापमान
चंद्रपुर ४६.६
ब्रम्हपुरी ४६.३
अकोला ४५.५
वर्धा ४५.०
नागपुर ४४.६
गोंदिया ४४.५
मालेगाव ४४.४
जळगाव ४४.३
अमरावती ४४.२
अहमदनगर ४३.२
सोलापुर ४२.९
परभणी ४२.८
नांदेड ४२.८
बुलढाणा ४२.०
नंदुरबार ४२.०
औरंगाबाद ४०.५
नाशिक ३८.१