![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी। दि.१ मे। जेवण चटकदार आणि चविष्ट होण्यासाठी लिंबाची फोड हवीच. अन्न पचन होण्यासाठीदेखील या लिंबाचा चांगला उपयोग होतो. एरवी मुबलक प्रमाणात मिळणारी लिंबं आता दिसेनाशी झाली आहेत. पोलादपूरच्या हॉटेलमधील नाश्ता तसेच जेवणातून तर लिंबाच्या फोडी गायब झाल्या असून “लिंबू नही मिलेगा” असा जणू अलिखित नियमच झाला आहे. एकीकडे महागाईचा फटका बसत असतानाच दुसरीकडे उन्हाचादेखीस जबरदस्त चटका जाणवू लागला असून हॉटेल व्यावसायिकांना लिंबाच्या एका नगासाठी तब्बल 10 रूपये मोजावे लागत आहेत.
हॉटेलमधील राईस प्लेटमध्ये लिंबू आणि कांदा हमखास दिला जातो. मात्र महागाईचे कारण देत लिंबू देणे बंद झाले आहे. जेवण झाल्यांनंतर फिंगर बाऊलमध्येदेखील लिंबू असते. या फिंगर बाउलमधूनही लिंबाने काढता पाय घेतला आहे. मार्केटमध्ये लिंबाच्या कॅरेटसाठी 500 ते 600 रूपये द्यावे लागत असल्याने हा दर कुणालाच परवडत नाही. सध्या शाळांना सुट्ट्या असल्याने अनेक कुटुंबे पर्यटनासाठी येत असतात. मात्र हॉटेलमध्ये जेवताना लिंबू मिळत नसल्याने अनेक पर्यटक नाराजी व्यक्त करीत आहेत.
गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत यंदा लिंबाच्या दरात कमालीची वाढ झालेली दिसत आहे. एरवी एक किंवा दोन रूपयांना मिळणारे लिंबू दहा रूपयांवर गेले आहे. आकाराने मोठे लिंबू हवे असल्यास पंधरा रूपये द्यावे लागत असून लिंबाने ग्राहकांच्या खिशाला चांगलीच कात्री लावली आहे. सोशल मीडियावरदेखील लिंबू महाग झाल्याच्या मिम्स फिरत असून घराला नजर लागू नये म्हणून दरवाज्यावर लावण्यात येणाऱ्या लिंबू, मिरचीमधून लिंबू गायब झाले आहे.
सरबताचा ग्लास 20 रूपये
उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत असल्याने लिंबू सरबताला सर्वाधिक मागणी असते. एरवी हातगाड्यांवर 10 रूपयांना मिळणारा लिंबू सरबताचा ग्लास आता 20 रूपयांवर गेला आहे. अवकाळी पावसाचा फटकादेखील लिंबाला बसला असून उत्पादन घटल्याने मार्केटमध्ये लिंबाला सोन्याचा भाव आला आहे.