महाराष्ट्र । विशेष प्रतिनिधी । दि.२ मे । इंडोनेशियाने पाम तेलाच्या निर्यातीवर बंदी घातल्याच्या निर्णयानंतर भारतातील खाद्यतेलाच्या किमती भरमसाठ वाढल्या. या वाढीला आळा घालता यावा म्हणून सरकार खाद्यतेलाच्या आयातीवर उपकर कमी करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. खाद्यतेलाच्या दरात वाढ झालेली असताना येत्या काही दिवसांत त्यात आणखी वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, भारत आपल्या खाद्यतेलाची निम्मी आयात इंडोनेशियामधून करतो.
देशात खाद्यतेलाची कमतरता नाही
इंडोनेशियाने बंदी घातली असली तरी भारतात खाद्यतेलाचा पुरेसा साठा असल्याचे ग्राहक मंत्रालयाने म्हटले आहे. 2021-22 मध्ये सोयाबीनचे उत्पादन 126.10 दशलक्ष टन होते, जे गेल्या वर्षीच्या 112 दशलक्ष टनांपेक्षा जास्त आहे. मोहरीच्या पेरणीतही 37 टक्के वाढ झाली आहे. मंत्रालयाने सांगितले की, सरकार खाद्यतेलाच्या किमतींवर लक्ष ठेवून आहे आणि किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील. यासोबतच साठेबाजी करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विशेष पथकेही तयार करण्यात आली आहेत.
खाद्यतेलावरील कृषी उपकर कमी होण्याची शक्यता
असे मानले जात आहे, महागड्या तेलापासून सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी क्रूड पामतेलावरील 5 टक्के कृषी उपकर शून्यावर आणला जाऊ शकतो, महागड्या खाद्यतेलामुळे तेल उद्योगही हैराण झाला आहे. यामुळेच उद्योगांनी सरकारकडे कॅनोला तेलावरील आयात शुल्क 38.5 टक्क्यांवरून 5.5 टक्क्यांवर आणण्याची मागणी केली आहे. जेणेकरून कॅनोला तेलाची आयात सुरू करता येईल.
इंडोनेशियाने त्रास वाढवला
इंडोनेशियाने पाम तेलाच्या निर्यातीवर बंदी घातल्यानंतर भारतात येणारे 2,90,000 टन खाद्यतेल इंडोनेशियाच्या बंदरमध्ये अडकले आहे. दरम्यान इंडोनेशियाने क्रूड पाम तेल आणि रिफाइंड पाम तेलावर बंदी घातली आहे, त्यामुळे भारतात वनस्पती तेलाचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. खरं तर, इंडोनेशियाने 28 एप्रिल 2022 पासून पाम तेलाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. इंडोनेशिया हा पाम तेलाच्या सर्वात मोठ्या उत्पादकांपैकी एक आहे, तर भारत हा जगातील सर्वात मोठ्या खाद्यतेलाचा – विशेषतः पाम तेल आणि सोया तेलाचा सर्वात मोठा आयातदार आहे.