महाराष्ट्र । विशेष प्रतिनिधी । दि.२ मे । मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS president Raj Thackeray) यांनी औरंगाबाद (Aurangabad) येथे भोंग्यावरून थेट 4 तारखेचा इशारा दिला. तसंच शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर निशाणा साधला असून यावर बोलताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil) याबाबत मुंबईत बैठक घेऊन पुढील निर्णय ठरवू असं म्हटलंय. तर पवारांवर आरोप हे बालिशपणा असल्याचं गृहमंत्र्यांनी म्हटलं आहे.
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आज वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेनंतर गृह विभाग अॅक्शन मोडमध्ये आल्याचं दिसून येत आहे. राज ठाकरेंच्या औरंगाबाद सभेनंतर संवेदनशील भागांसाठी विशेष सूचना गृह मंत्रालयाकडून करण्यात येणार असल्याचं गृहमंत्र्यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांच्या भाषणाबाबत कायदेशीर मत जाणून कारवाई करणार असल्याचंही ते म्हणालेत.
जनतेनं शांत राहावं. कायदा आणि सुव्यवस्था म्हणून प्रश्न उद्भवणार नाही याची काळजी घ्यावी, असं आवाहनही गृहमंत्र्यांनी केलं आहे. देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत पोलिसांची परवानगी घेऊन भोंगे लावावे, राज ठाकरे काही सर्वोच्च न्यायालयाच्या वरचे नाहीत. ते न्यायालयाचा आदेश डावलू शकत नाहीत. वाद पुन्हा न्यायालयात पोहोचला तर रात्रीचे किर्तन, पहाटे पाच वाजताची काकड आरती, नवरात्रोत्सव, गणेशोत्सव, गोंधळ, जागरण या सर्व गोष्टींवर परिणाम होईल. कायद्याप्रमाणे पोलिसांची परवानगी घेऊन सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत भोंगे लावण्यास परवानगी असल्याचंही दिलीप वळसे पाटील म्हणाले आहेत.