महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी। दि.३ मे । देशात एप्रिल महिन्यात बेरोजगारी दर वाढून ७.८३% झाला, तो मार्चमध्ये ७.६०% होता. सेंटर फॉर मॉनिटरिंग ऑफ इंडियन इकॉनॉमीच्या (सीएमआयई) आकडेवारीनुसार शहरांत बेरोजगारी दर ९.२२% झाला आहे, तो मार्चमध्ये ८.२८% होता. ग्रामीण भागांत बेरोजगारी दर घटला आहे. गावांत हा दर ७.१८% होता, तो मार्चमध्ये ७.२९% होता. राज्यनिहाय पाहिल्यास हरियाणात बेरोजगारी दर ३४.५% आणि राजस्थानमध्ये २८.८% नोंदण्यात आला. महाराष्ट्र ३.१% सह १७ व्या स्थानी आहे. सर्वात कमी बेरोजगारी दर हिमाचल प्रदेशमध्ये ०.२% तर छत्तीसगडमध्ये ०.६% नोंदला गेला. हरियाणात हा दर वाढण्याची ३ कारणे सांगितली जात आहेत. पहिले- दोन वर्षांपासून सरकारी नोकऱ्या नगण्य आहेत. दुसरे- रशिया व युक्रेन युद्धामुळे व्यावसायिक क्षेत्रावर परिणाम झाला आहे. तिसरे- खंडित वीजपुरवठ्यामुळे औद्योगिक उत्पादन घटले.
मार्केटमधून घटले ३८ लाख कामगार सीएमआयईनुसार, देशात आर्थिक घडामोडी कमकुवत झाल्याने एप्रिलमध्ये ३८ लाख कामगार कमी झाले. दुसरीकडे, रोजगारासाठी पात्र कोट्यवधी लोकांनी नोकरीचा शोधच सोडला. कारण बाजारात काम नाही, असे त्यांना वाटते. डेलॉय इंडियाच्या अर्थतज्ज्ञ रुमकी मजूमदार यांच्या मते, कोरोना काळानंतर भारतीय अर्थव्यवस्था रोजगार निर्मितीबाबत अनेक प्रकारच्या अाव्हानांचा सामना करत आहे. ही स्थिती जवळपास सर्व क्षेत्रांत कायम आहे.
सीएमआयईच्या डेटाकडे असते अर्थतज्ज्ञ आणि धोरण तयार करणाऱ्यांचे लक्ष
मुंबईमधील सेंटर फॉर मॉनिटरिंग ऑफ इंडियन इकॉनॉमीच्या (सीएमआयई)डेटाकडे देशातील अर्थतज्ज्ञ आणि धोरण तयार करणाऱ्यांचे लक्ष असते, कारण सरकार स्वत: दर महिन्याची आकडे जारी करत नाही. अर्थतज्ज्ञांच्या मते देशांतर्गत मागणी कमी झाली आहे तसेच महागाई वाढल्याने अर्थव्यवस्था पुन्हा सुरळीत होण्याची गती कमी झाल्याने रोजगाराच्या संधी कमी झाल्या आहेत. मार्चमध्ये किरकोळ महागाईचा दर ६.९५ टक्क्यांवर गेला आहे, तो १७ महिन्यांतील सर्वाधिक होता. या वर्षात तो ७.५ टक्क्यांवर जाण्याची शक्यता आहे.
सर्वात जास्त बेरोजगारी दर
हरियाणा 34.5%
राजस्थान 28.8%
बिहार 21.1%
जेअँडके 15.6%
गोवा 15.5%
सर्वात कमी बेरोजगारी दर
हिमाचल प्रदेश 0.2%
छत्तीसगड 0.6%
आसाम 1.2%
ओडिशा 1.5%
गुजरात 1.6%