महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी। दि. ५ मे । सतत होणाऱ्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. यात रोजच्या वापरातील वस्तूंपैकी खाद्यतेलाच्या किमतीमध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. खाद्यतेलात सर्वाधिक खप असलेल्या सोयाबीन तेलाच्या किमतीत मागील १० वर्षांमध्ये तब्बल १४०% तर दुधाच्या किमतीत ७२% वाढ झाली आहे. सोन्याच्या दरातील वाढ मात्र सरासरीमध्येच आहे. २०१२ मध्ये सोयाबीन तेलाचे एक किलोचे पॅकेट ७१ रुपयांना मिळत होते. तेच पॅकेट आता तब्बल १७० रुपयांना मिळत आहे. खाद्यतेलाच्या पाठोपाठ दुधाचेदेखील भाव वाढले आहेत. उन्हाळ्यात वाढलेली दुधाची मागणी आणि पशूखाद्य महागल्यामुळे दुधाच्या किंमती वाढल्याचा अंदाज तज्ज्ञ वर्तवतात.
१० वर्षांत गायीचे दूध २८ रुपयांवरून ४८ रुपये लिटर
सध्या पेट्रोल आणि सोन्याच्या दरात मोठी तेजी असल्याचे सर्वचजण बोलतात. विशेषत: पेट्रोलची सर्वाधिक चर्चा आहे. मात्र, मागील दहा वर्षांतील दरवाढीचा टक्का सोने, पेट्रोलपेक्षाही दुधाचा अधिक आहे. दहा वर्षांपूर्वी २०१२ मध्ये गायीच्या दुधाच्या दर (बॅग) हा २८ रुपये होता, सध्या तो ४८ रुपये प्रतिलिटर एवढा आहे. औरंगाबाद जिल्हा सहकारी दूध संघाचे एमडी प्रदीप पाटील यांच्या मते, सध्या देशात दुधाच्या पावडरसह उपपदार्थांची मागणी प्रचंड वाढलेली आहे. शिवाय तेलबियांचे उत्पादन घटल्यामुळे पशूखाद्यही जवळपास ३० ते ४० टक्क्यांनी महागले आहे. त्यामुळे दुधाचे दर उच्चांकी आहेत.