मनसेच्या संदीप देशपांडेंवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल; पोलिसांची कठोर कारवाई

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी। दि. ५ मे । मशिदीवरील भोंगे हटवण्याच्या राज ठाकरेंच्या आदेशानंतर राज्यभरात ठिकठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी हनुमान चालीसा लावली होती. राज्यात कुठेही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांनी विशेष खबरदारी घेतल्याचं पाहायला मिळालं. राज्यभरात मनसेच्या पदाधिकाऱ्यांना प्रतिबंधात्मक नोटीस बजावली होती. त्यानंतर अनेक कार्यकर्त्यांची धरपकड केली. राज ठाकरेंसह मनसे नेत्यांनाही पोलिसांनी
नोटीस बजावली.

४ मे रोजी मनसे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मनसे नेत्यांना ताब्यात घेतले जात होते. ‘शिवतीर्थ’ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी मनसे नेते संदीप देशपांडे, संतोष धुरी पोहचले होते. मात्र यावेळी घरातून बाहेर निघाल्यानंतर देशपांडे आणि धुरी यांना पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र संदीप देशपांडे आणि संतोष धुरी पोलिसांच्या तावडीतून निसटले. या झटापटीत महिला पोलीस कर्मचाऱ्याला धक्का लागून ती खाली पडली. या महिला पोलीस कर्मचारी जखमी झाली. त्यामुळे संदीप देशपांडे, संतोष धुरी यांच्यावर शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे आता अटकपूर्व जामीनासाठी मनसे नेत्यांनी हालचाली सुरू केल्या आहेत.

 

संदीप देशपांडे काय म्हणाले?

सकाळी मी राज ठाकरेंना भेटायला गेलो होतो. माध्यमांच्या प्रतिनिधींनी बाईट मागितला. मी त्यांच्याशी संवाद साधत असताना दादर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कासार तिथे आले. त्यांनी मला बाजूला नेण्याचा प्रयत्न केला. तुम्ही मला ताब्यात घेत आहात का? असा प्रश्न मी त्यांना विचारला. त्यावर ताब्यात घेत नाही, गर्दी होत असल्यानं बाजूला घेत असल्याचं त्यांनी सांगितलं,’ अशा शब्दांत देशपांडेंनी घटनाक्रम सांगितला.

माध्यमांशी बोलत असताना पोलीस निरीक्षक कासार मला थोड्या अंतरावर घेऊन गेले. सकाळपासून मी कोणतंही आंदोलन केलेलं नाही. मग मला ताब्यात का घेत आहात, असा प्रश्न मी त्यांना विचारला. आतापर्यंत आम्ही पोलिसांना सहकार्यच करत आलो आहोत. अनेकदा स्वत: मी पोलीस ठाण्यात हजर झालो आहे. पोलिसांचा आम्ही सन्मानच करतो. मी धक्काबुक्की केल्याचं, महिला पोलिसाला जखमी केल्याचं कासार साहेबांनी हृदयावर हात ठेवून सांगावं. मी खोटं बोलत असेन, पण सीसीटीव्ही फुटेज, माध्यमांचे कॅमेरे खोटं बोलणार नाहीत, असंही देशपांडे म्हणाले. मी पळून गेलो नाही. आम्ही अटकेला घाबरत नाही. कायदेशीर सल्ला घेण्यासाठी आलो आहे, असं त्यांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *