मनसे आणि शिवसेनेनंतर आता औरंगाबादमध्ये त्याच मैदानावर MIM ची सभा होणार ?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ५ मे । महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना यांच्यापाठोपाठ आता औरंगाबादमध्ये लवकरच एमआयएमची सभा होणार आहे. एमआयएमचे (MIM) खासदार इम्तियाज जलील यांनी यासंदर्भात सुतोवाच केले. मनसे आणि शिवसेनेला सभेसाठी परवानगी मिळत असेल तर मग आमच्यावर प्रतिबंध आहेत का? आम्हीदेखील औरंगाबादच्या मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर भव्य सभा घेऊ, असे इम्तियाज जलील यांनी म्हटले. त्यामुळे आता एमआयम या सभेसाठी नेमका कोणता मुहूर्त निवडणार, हे पाहावे लागेल.

यापूर्वी १ मे रोजी महाराष्ट्र दिनी औरंगाबादमध्ये मनसेप्रमुख राज ठाकरे यांची सभा पार पडली होती. या सभेला पोलिसांनी सुरुवातीला परवानगी नाकारली होती. मात्र, अखेरच्या क्षणी पोलिसांनी अटी-शर्तींसह या सभेला परवानगी दिली होती. मात्र, राज ठाकरे यांच्या सभेत बहुतांशी नियमांचे उल्लंघन झाले होते. याप्रकरणी राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हाही दाखल झाला असून आता त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.तर दुसरीकडे मनसेच्या सभेनंतर त्याच मैदानावर ८ जूनला शिवसेनेची सभा होणार आहे. मराठवाड्यातील शिवसेनेची पहिला शाखा औरंगाबादेत ८ जून १९८५ रोजी स्थापन झाली. या शाखेच्या ३७व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून ठाकरे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेत उद्धव ठाकरे काय बोलतात, हे पाहावे लागले.

मात्र, शिवसेना आणि मनसेच्या सभेप्रमाणे औरंगाबाद पोलीस एमआयएमच्या सभेला परवानगी देणार का, हेदेखील पाहावे लागेल. एमआयमच्या या सभेला परवानगी मिळाल्यास पक्षाचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी याठिकाणी येण्याची शक्यता आहे. यावेळी ते मशिदींवरील भोंगे हटवण्यासंदर्भात काय भूमिका घेतात, ते पाहावे लागेल. या सभेमुळे औरंगाबादमधील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *