महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ५ मे । बुधवारी झालेल्या घसरणीनंतर आज शेअर बाजारात तेजीचे संकेत मिळत आहेत. शेअर बाजाराची सुरुवात गॅप अप ओपनिंगने झाली आहे. बाजारात शेअर खरेदीचे संकेत दिसून येत आहे.
आज सेन्सेक्स 600 अंकानी वधारत 56, 269.91 अंकावर सुरू झाला. निफ्टी निर्देशांकदेखील एक टक्क्यांनी वधारला आहे. निफ्टी 177 अंकानी वधारत 16,854.75 अंकावर सुरू झाला. निफ्टी 50 मधील 45 स्टॉकचे शेअर दर वधारले आहेत. तर, 5 स्टॉकच्या दरात घसरण दिसून येत आहे. बँक निफ्टी जवळपास 400 अंकानी वधारला असून 35655 अंकावर व्यवहार करत आहे.
आज आयटी, बँकिंग आणि एफएमसीजी क्षेत्रातील शेअरमध्ये तेजी दिसून आली आहे. मेटल आणि वित्तीय क्षेत्रातील शेअर दरात चांगली खरेदी सुरू असल्याचे चित्र आहे. मीडिया शेअर मध्ये घसरण सुरू आहे. हिरोमोटोकॉर्प शेअर दरात 3.5 टक्क्यांची वाढ झाली आहे. ओएनजीसीमध्ये 2.99 टक्के आणि टेक महिंद्राच्या शेअर दरात 2.56 टक्क्यांची वाढ झाली आहे. टाटा स्टीलमध्ये 2.46 टक्के, इन्फोसिसमध्ये 2.05 टक्क्यांची तेजी दिसून आली आहे.
निफ्टीमधील टाटा कंसोर्शियमध्ये 2.60 टक्क्यांची घट दिसून येत आहे. नेस्लेमध्ये 0.84 टक्क्यांची घसरण दिसून येत आहे. टायटनच्या शेअर दर 0.61 टक्क्यांनी घसरला आहे. अपोलो हॉस्पिटल आणि एनटीपीसीच्या शेअर दरात घसरण सुरू आहे.
दरम्यान, अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हनं देखील व्याजदरात वाढ केली आहे. महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी अमेरिकी फेडनं आक्रमक पावलं उचलली आहेत. फेडकडून अपेक्षेप्रमाणे अर्ध्या टक्क्यांनी व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. याबाबत फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी घोषणा केली आहे. अमेरिकेत मार्चमध्ये किरकोळ चलनवाढीचा दर 5.2 टक्क्यांवर पोहोचला आहे. हा दर 2 टक्क्यांपर्यंत ठेवण्याचे आव्हान अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेसमोर आहे.