महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ६ मे । राज्यामध्ये उष्म्याचा दाह वाढत असून आतापर्यंत राज्यात उष्माघातामुळे १७ जणांचा बळी गेला असून संशयित मृत्यूंची संख्या २५ नोंदवण्यात आली आहे. सर्वाधिक मृत्यूंची नोंद ही नागपूर विभागात झाली असून ती ११ आहे तर औरंगाबाद, नाशिक, अकोला येथे चार जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. राज्यात एकूण ४४० उष्माघाताच्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर प्रत्येक जिल्ह्यातील उष्माघात अन्वेषण समितीने दिलेल्या अहवालानुसार राज्यात १७ जणांचा मृत्यूचे निश्चित निदान करण्यात आले आहे.
नागपूर विभागामध्ये ३५० उष्माघाताचे रुग्ण असून येथे ११ जणांपैकी ९ जणांचा मृत्यूचे निदान उष्माघात मृत्यू अन्वेषण समितीने केले आहे. अकोला येथे चार संशयित तर एक निश्चित, औरंगाबाद विभागामध्ये पाच संशयित तर दोन निश्चित, जालना येथे दोन, परभणीमध्ये एक, हिंगोली येथे एका मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. राज्याच्या एकात्मिक रोग सर्वेक्षणातंर्गत देण्यात आलेल्या अहवालामध्ये ही माहिती देण्यात आली आहे.
रुग्णसंख्या
विभाग – रुग्णसंख्या
ठाणे – २
पुणे -२२
कोल्हापूर – १
औरंगाबाद – १५
नाशिक – १५
अकोला – ३४
चंद्रपूर – १२४
गडचिरोली – २२
नागपूर – ३५०
राज्य – ४४०
हवामान खात्याशी समन्वय
संभाव्य उष्णतेच्या लाटेची पूर्वकल्पना देण्यासाठी हवामान खात्याच्या मदतीने यंत्रणा निर्माण करण्यात आली असून हे इशारे सामान्यांना समजावेत, यासाठी कलरकोडिंगची कल्पना वापरण्यात येत असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.
पांढरा रंग – नेहमीच्या कमाल तापमानापेक्षा कमी तापमान
पिवळा अलर्ट – नेहमीच्या कमाल तापमानाएवढे तापमान
केशरी अलर्ट – कमाल तापमानापेक्षा चार ते पाच अंश सेल्सियस. जास्त तापमान
लाल अलर्ट – नेहमीच्या कमाल तापमानापेक्षा सहा अंश सेल्सियस. किंवा त्यापेक्षा अधिक तापमान