महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ६ मे । राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे यांनी 103 वर्षांपूर्वी पाठवलेले पत्र प्रकाशात आले आहे. प्रबोधनकारांनी शाहू महाराजांची अनेकदा भेट घेतली होती आणि महाराजांच्या समाज सुधारणेच्या महान कार्याबद्दल त्यांना अत्यंत आदर होता हे या दुर्मिळ पत्रातील मजकुरातून अधोरेखित होते. प्रबोधनकारांनी महाराजांना पाठवलेली सर्व उपलब्ध पत्रे सरकारने प्रसिद्ध करावीत अशी मागणी होत आहे.
छत्रपती शाहू महाराजांना प्रबोधनकारांनी लिहिलेल्या पत्रांपैकी सात पत्रे कोल्हापूरच्या अभिलेखागारात शाहू महाराज दफ्तरामध्ये जतन करून ठेवण्यात आली आहेत. सर्व पत्रे टंकलिखित आहेत. त्यातील प्रबोधनकारांनी शाहू महाराजांच्या पहिल्या भेटीनंतर 23 मार्च 1919 रोजी लिहिलेले पत्र उजेडात आले आहे. समाजातील जातीभेदाच्या भिंती दूर करण्याच्या दिशेने छत्रपती शाहू महाराजांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले होते. महाराजांवर पुण्यातील वृत्तपत्रांमधून टीका होत होती. त्याबद्दल प्रबोधनकारांनी या पत्रात आपली भूमिका सडेतोडपणे मांडली आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे मुंबईत आले की गिरगावच्या खेतवाडी येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांचा मुक्काम असे. खेतवाडी तेरावी गल्ली येथे असलेल्या या निवासस्थानाला ‘पन्हाळा लॉज’ असे नाव होते. त्याच निवासस्थानी 6 मे 1922 रोजी शाहू महाराजांनी अखेरचा श्वास घेतला होता. तत्पूर्वी 5 मे रोजी रात्री प्रबोधनकार ठाकरे यांनी शाहू महाराजांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.