उष्णतेची लाट आणखी आठवडाभर राहणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ६ मे । यंदाची भारतातील उष्णतेची लाट अतितीव्र असून, ही आणखी आठवडाभर म्हणजे 12 मेपर्यंत राहील, असा अंदाज ‘नासा’ने एका विशेष अहवालात दिला आहे. हवेची खराब गुणवत्ता, मोसमीपूर्व पावसात घट, पिकांवर विपरीत परिणाम, कोळशाची टंचाई व जंगलात लागलेल्या तीनशेपेक्षा जास्त आगींच्या घटना यांचा सामना भारतीयांना करावा लागल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

‘नासा’ने भारतातील मार्च व एप्रिल या दोन्ही महिन्यांतील उष्णतेच्या तीव्र लाटांचा अभ्यास करून काही छायाचित्रेही प्रसिद्ध केली आहेत. सध्या संपूर्ण पृथ्वी जणू धगधगता अग्निकुंडच बनला आहे. मात्र, यात भारत अधिकच गडद लाल रंगात पृथ्वीच्या नकाशात दिसत आहे. या अहवालात म्हटले आहे की, एप्रिल 2022 चा दुसरा व शेवटचा आठवडा अतितीव्र उष्ण लाटांचा ठरला. यात पूर्व, मध्य आणि वायव्य भारतात कमाल तापमान 4.5 ते 8.5 अंशांनी जास्त वाढलेले दिसले. भारतीय हवामानशास्त्र विभागाने 2015 पासून 120 वर्षांतील तापमानाच्या नोंदी ठेवण्यास सुरुवात केली.

काय झाले दुष्परिणाम?
हवेची गुणवत्ता खराब झाली, मोसमीपूर्व पावसात मोठी घट, पीक उत्पादनात घट, विजेची मागणी वाढली, कोळशाच्या साठ्यात घट, उत्तराखंड, हिमाचल प्रदेशसह बर्फाळ डोंगर झपाट्याने वितळत आहेत. भारतीय वन सर्वेक्षणानुसार, यंदा जंगलात 300 पेक्षा जास्त मोठ्या आगी लागल्या. त्यातील एकतृतीयांश आगीच्या घटना एकट्या उत्तराखंडमध्ये घडल्या.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *