प्रशांत किशोर यांची पदयात्रा गांधी जयंतीपासून

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ६ मे । निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर (पीके) यांनी आज नव्या राजकीय पक्षाची घोषणा करण्याचे टाळत थेट लोकांमध्ये जाण्याची घोषणा केली. ते यासाठी तीन हजार किलोमीटरची पदयात्रा काढणार असून तिची सुरूवात २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांच्या जयंतीपासून होणार आहे. चंपारण्यमधील गांधीजींच्या आश्रमातूनच या यात्रेचा प्रारंभ होईल. येत्या तीन ते चार महिन्यांमध्ये जनसुराजसाठी ‘पीके’ एक वेगळी मोहीम राबविणार असून त्यादरम्यान ते राज्यातील नामांकित लोकांशी संवाद साधतील. राज्यामध्ये ज्यांना सकारात्मक बदल घडवून आणायचे आहेत त्यांना आपण आपल्या चळवळीशी जोडून घेऊन असे ‘पीके’ यांनी म्हटले आहे.

बिहारमध्ये आता बदल आणि नवी विचारधारा यांची आवश्यकता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पीके म्हणाले, की ‘‘ गरज भासली तर भविष्यामध्ये राजकीय पक्षाच्या स्थापनेचीही घोषणा करण्यात येईल पण तो पक्ष केवळ प्रशांतकिशोर या एका व्यक्तीचा नसेल तर तो जनतेचा असेल. लालू आणि नितीश यांच्या ३० वर्षांच्या राजवटीमध्ये बिहारची सगळ्याच आघाड्यांवर मोठी पीछेहाट झाली आणि हे सर्वांत गरीब राज्य बनले. या वास्तवाला कोणीच नाकारू शकत नाही. आरोग्य, शिक्षण आदी आघाड्यांवर बिहार रसातळाला गेला आहे. बिहारला यामध्ये आघाडी घ्यायची असेल तर नवा विचार आणि नवे प्रयत्न यांची गरज आहे.’’

मार्ग बदलावा लागेल

येत्या दहा ते पंधरा वर्षांमध्ये बिहारमध्ये बदल घडवून आणायचा असेल तर ज्या मार्गावरून सध्या तो चालतो आहे, तो मार्ग त्याच्यासाठी लाभदायी नाही. यामध्ये बदल करणे गरजेचे आहे. या सगळ्यासाठी नवा विचार आणि नवे प्रयत्न हे गरजेचे असतील. कोणतीही व्यक्ती अशाप्रकारची क्षमता केवळ आपल्याकडेच आहे असा दावा करू शकत नाही. राज्याची परिस्थिती सुधारण्यासाठी बिहारमधील प्रत्येक नागरिकाला पुढाकार घेणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *