महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ६ मे । मुंबईत दादर येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानाबाहेर पोलिसांना चकवा देऊन मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी पसार होत असताना झालेल्या गदारोळात महिला पोलीस जखमी झाली होती. याप्रकरणी संदीप देशपांडे यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांचा शोध घेतला जात आहे. यात आता संदीप देशपांडे पोलिसांच्या हातून निसटून जात असताना त्यांची कार दामटवणाऱ्या ड्रायव्हरला शिवाजी पार्क पोलिसांनी अटक केली आहे.
मशिदीवरील भोंग्यांच्या विरोधात मनसेचं आंदोलन सुरू असून पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई अंतर्गत मनसे कार्यकर्त्यांना नोटीस पाठविण्यात आल्या आहेत. तसंच काही कार्यकर्त्यांना प्रतिबंधात्मक कारवाई अंतर्गत ताब्यातही घेण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस ४ मे रोजी मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना ताब्यात घेण्यासाठी शिवाजी पार्क परिसरात पोहोचले होते. यावेळी माध्यमांचा गराडा आणि झालेल्या गर्दीतून वाट काढत संदीप देशपांडे व संतोष धुरी आपल्या खासगी कारमध्ये बसून पोलिसांच्या हातून निसटले होते. या झटापटीत एक महिला पोलीस खाली पडून जखमी झाली होती. याच प्रकरणात मुंबई पोलिसांनी संदीप देशपांडे यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.