महाराष्ट्र २४- ऑनलाईन – , मुंबई – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेशी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला. जनतेशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी काही महत्त्वाच्या सूचना महाराष्ट्रातील नागरिकांना केल्यात. यातील सर्वात महत्त्वाची सूचना म्हणजे आता घरातून बाहेर कुणीही औषधं किंवा धान्य घ्यायला जात असाल तर त्यांनी मास्क घालणं गरजेचं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या व्यतिरिक्त महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. याबाबत देखील मुख्यमंत्र्यांनी माध्यमांना आणि महाराष्ट्रातील जनतेला माहिती दिली.
सध्याचा काळ हा हा काळ विषाणूच्या गुणाकाराचा काळ असल्याचं मुख्यमंत्री म्हणालेत.
* घराबाहेर पडताना कायम मास्क वापरा. आपल्याकडे मास्क नसेल तर स्वच्छ रुमालाचा किंवा फडक्यांच्या घड्या घालून आपल्या चेहऱ्यावर बांधणं अत्यन्त गरजेचं आहे. मास्क टाकताना आपण सर्वांनी खूप काळजी घेतली पाहिजे. कारण मास्क फेकल्यावर यातून कोरोना पसरण्याची भीती आहे. म्हणूनच वापरलेला मास्क सुरक्षित जागा पाहून फेकावा. योग्य जागा पाहून मास्क जाळून टाकणे आणि त्याची राख नीट फेकणे हा मास्क फेकण्याचा उत्तम पर्याय असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
*कुणालाही सर्दी खोकला तापाची लक्षणं असतील तर अशांनी फ्युएल क्लिनिक मध्येच जायला हवं. याबाबत माहिती प्रत्येकाला दिली जाईल असं देखील मुख्यमंत्री म्हणालेत. सर्दी खोकला तापाची लक्षणं असणाऱ्यांना फिव्हर क्लिनिकमध्ये तपासलं जाईल आणि पुढे काय उपचार दिले जातील याबद्दल सांगण्यात येईल. सर्वात बेसिक लेव्हलवर यामध्ये फिव्हर क्लिनिक, त्यानंतर कोरोनाची लक्षणं नसणाऱ्यांसाठी आणि अगदी सौम्य लक्षणं असणाऱ्यांसाठी
आणि कोरोनाची गंभीर लक्षणं अधिक इतर आजार ( हृदयविकार, मधुमेह, स्वसनाचे त्रास, रक्तदाब) असणाऱ्यांसाठी वेगळं सुसज्ज रुग्णालय असणार आहे. यामध्ये सर्व निष्णात डॉक्टर्स असणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिलीये.
* मुख्यमंत्र्यांनी ज्यांच्याकडे अधिकृत मेडिकल कोर्सची पदवी आहे किंवा ज्यांनी अधिकृत ट्रेनिंग घेतलंय अशा सर्वांना कोरोना विरुद्धच्या लढ्यात हातभार लावण्याचं आवाहन केलाय. मुख्यमंत्र्यांनी आर्मी किंवा डिफेन्समधील कोअर मेडिकल टीममध्ये असलेल्या मात्र आता निवृत्त असेलेल्या नागरिकांना देखील आरोग्य सेवेत हातभार लावण्याचं आवाहन केलंय. दरम्यान ज्यांना वैद्यकीय क्षेत्रात अनुभव आहे किंवा प्रशिक्षित आरोग्य कर्मचार्यांनीच यामध्ये सहभाग घ्यावा असं मुख्यमंत्र्यानी सांगितलं आहे. यामध्ये सहभाग घेण्यासाठी covidyoddha@gmail.com या ई-मेलवर आपली माहिती पाठवायची आहे.