Zero Covid policy : राष्‍ट्रपती जिनपिंग यांचा ‘झिरो कोविड’चा हट्ट, चीनमध्‍ये ३४ कोटी नागरिक घरात बंद

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ८ मे । कोरोना महामारी महासंकट येवून आता सुमारे अडीच वर्ष लोटली आहेत. या महासंकटाशी मुकाबला करत संपूर्ण जगातील जनजीवन पूर्वपदावर येत आहे. मात्र चीन हा देश याला अपवाद ठरत आहे. कारण चीन वगळता जगात अन्‍य कोणत्‍याही देशात लॉकडाउन लावण्‍यात आलेले नाही. राष्‍ट्रपती जिनपिंग यांचा झिरो कोविड पॉलिसी ( Zero Covid policy) या योजनेची अंमलबजावणी हट्ट आता सर्वसामान्‍य नागरिकांच्‍या मुळावर आला आहे. याच योजनेतंर्गत मागील पाच दिवसांत चीनमधील २० शहरात पुन्‍हा एकदा लॉकडाउन लावण्‍यात आले आहे. आता देशभरात लॉकडाउन असणार्‍या शहरांची संख्‍या ४६ झाली आहे. तब्‍बल ३४ कोटी नागरिक घरांमध्‍ये कैद आहेत.

चीनमध्‍ये झिरो कोविड पॉलिसी ही कुचकामी ठरली आहे. तरीही ही योजना राबविण्‍याचा राष्‍ट्रपती जिनपिंग यांचा हट्ट कायम आहे. अन्‍य देशांनी आमच्‍या झिरो कोविड पॉलीसी योजनेवर बोलू नये, असा इशाराही त्‍यांनी नुकताच राष्‍ट्राला संबोधताना दिला होता. या योजनेतंर्गत कोरोनाचा रुग्‍ण आढळल्‍यास त्‍याला थेट रुग्‍णालयात दाखल करण्‍यात येते. आता कोरोना परिस्‍थिती हाताळण्‍यासाठी लष्‍कराला पाचारण करावे लागेल, असे संकेत कम्‍युनिस्‍ट पार्टीचे वरिष्‍ठ पदाधिकारी आणि राष्‍ट्रपती जिनपिंग यांचे निकटवर्ती ली क्‍वांग यांनी दिले आहेत. आता निर्बंध आणखी कडक करावे लागतील, असे त्‍यांनी म्‍हटलं आहे.

अडीच कोटी लोकसंख्‍या असणार्‍या शांघाय शहर लॉकडाउनमध्‍ये आहे. आता राजधानी बीजिंगमध्‍येही पुन्‍हा एकदा लॉकडाउनचा धोका आहे. शांघायमध्‍ये दररोज कोरोनाचे नवे पाच हजार रुग्‍ण आढळत आहेत. शांघाय सारखी परिस्‍थिती निर्माण होवू नये यासाठी बीजिंगमधील निर्बंध वाढविण्‍यात आले आहेत. राजधानीत रुग्‍णसंख्‍येत वाढ होत असल्‍याने आता दोन वर्ष ते ९० वर्षांपर्यंतच्‍या सर्व नागरिकांना कोरोना चाचणी सक्‍तीची करण्‍यात आली आहे. बीजिंगमधील ६० उपनगरातील रस्‍ते बंद करण्‍यात आले आहेत. त्‍याचबरोबर शाळा, जिम, हॉटेल आणि बार बंद ठेवण्‍यात आल्‍या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *