महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ८ मे । जम्मू-काश्मीरमधील कुलगाम भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. रविवारी सकाळपासूनच हि चकमक सुरु होती. या चकमकीत सुरक्षा दलांना दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले आहे. ही चकमक जम्मू-काश्मीरमधील च्यायान, कुलगाम आणि देवसर भागात सुरु आहे. या परिसरात जैश-ए-मोहम्मदचे दोन ते तीन दहशतवादी लपले असल्याची माहिती लष्कराला मिळाली होती. त्याप्रमाणे लष्कराने सकाळपासूनच सर्च मोहीम सुरु केली होती.
या दोन्ही दहशतवाद्यांना कुलगामच्या चेयान देवसर भागात ठार करण्यात आले. या दहशतवाद्यांकडून सुरक्षा जवानांनी शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा यासह इतर आक्षेपार्ह साहित्य जप्त केले. कुलगाम आणि देवसरमध्ये आणखी काही दहशतवादी लपल्याची शक्यता असल्याने लष्कराकडून त्यांचा शोध सुरु आहे.