महाराष्ट्र । विशेष प्रतिनिधी । दि.१२ मे । किडनी प्रत्यारोपण फसवणूक प्रकरणी रुबी हॉल क्लिनिकच्या डॉक्टरांविरोधात ( kidney racket ruby hall clinic ) गुन्हा दाखल झाल्याने पुण्यात खळबळ उडाली आहे. रुबी हॉल क्लिनिक हे पुण्यातील प्रतिष्ठीत आणि नामांकित हॉस्पिटल्स पैकी एक आहे. या पार्श्वभूमीवर डॉक्टरांवर गुन्हा दाखल झाल्याने रुबी हॉल क्लिनिकच्या प्रशासनाला मोठा धक्का बसला आहे. आता या प्रकरणी रुबी हॉल क्लिनिकची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. या प्रकरणी रुबी हॉल क्लिनिकने मोठा निर्णय घेतला आहे.
आपल्या डॉक्टरांविरोधात दाखल झालेले गुन्हे रुबी हॉल क्लिनिकने फेटाळून लावले आहेत. या प्रकरणी रुबी हॉल क्लिनिक मार्फत त्यांच्या कायदेशीर सल्लागार मंजुषा कुलकर्णी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कुठलाही दोष नसताना डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.
किडनी प्रत्यारोपण फसवणूक प्रकरणी आमचा दोष नसताना आमच्या विरोधात गुन्हा दाखल दाखल झाला आहे. ज्यांनी खोटे आधार कार्ड, पोलीस पडताळणी पत्र, विवाह प्रमाणपत्रासारखे कागदपत्रे तयार केली, त्यांना दोषी धरायला हवे. ज्या रुग्णाने पैसे देण्याचे आमिष दिले त्यात आमची कोणतीही भूमिका नाही. तरीही आमच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे, असं रुबी हॉल क्लिनिकच्या कायदेशीर सल्लागार मंजुषा कुलकर्णी म्हणाल्या. तसंच या प्रकरणी कायदेशीर लढाई लढण्याची तयारी असल्याचेही त्यांनी सांगितले.