महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १९ मे । मोठ्या माणसांची एक खास गोष्ट असते. ती आपलं मोठेपण कधीच जाणवू देत नाहीत. ही बाब रतन टाटा (Ratan Tata) यांना तंतोतंत लागू होते. त्यांनी आपल्या कृतीतून सातत्यानं ही बाब अधोरेखित केली आहे. नेहमीच त्यांनी आपल्या साध्या राहणीनं सगळ्यांना चकीत केलेलंय. आता पुन्हा एकदा तशीच बाब रतन टाटा यांनी केली आहे. गाडी आणि त्यातही आलिशान गाडीचा शौक कुणाला नसतो? मोठमोठ्या गाड्यांमधून फिरण्याची स्वप्न सामान्य माणूसही पाहतो. पण प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांची स्वतःची गाड्यांची कंपनी असूनही त्यांनी ज्या गाडीतून ताजमध्ये एन्ट्री मारली आहे, ती फारच खास ठरली. टाटा मोटर्स (Tata Motors) कंपनीच्या सर्वात स्वस्त समजल्या जाणाऱ्या नॅनोमधून (Tata Nano) रतन टाटा यांनी ताज हॉटेलमध्ये प्रवेश केला आणि त्यांच्या या प्रवेशाची चर्चा सोशल मीडियात तुफान झाली. आपल्या साधेपणानं सगळ्यांना मनात आपुलकीचं स्थान मिळवलेल्या रतन टाटा यांनी पुन्हा एकदा सगळ्यांना अवाक् केलंय.
रतन टाटा यांची नॅनोतली इन्ट्री ही जगावेगळी घटना नाही. सर्वसामान्य कृती आहे. पण ही सर्वसामान्य कृती त्यांच्यासारख्या माणसाला अधिक खुलवते. कारण, हल्लीच्या जमान्यात नेतेमंडळी, उद्योगपती, अभिनेते, सेलिब्रिटी सगळ्यांना आलिशान गाड्यांमधून फिरण्याचा शौक असल्याचं पाहायला मिळतं. गावचा संरपंचही, किंवा अगदी नगरसेवकपण स्कॉर्पिओ किंवा इनोव्हाच्या खाली नसतो. अशावेळी अवघ्या लाखभर रुपयांच्या नॅनोतून जेव्हा प्रसिद्ध उद्योगपती रतन टाका ताजमध्ये पोहोचतात तेव्हा काहींच्या भुवया उंचावणं स्वाभाविकच आहे.
सध्या टाटाच्या इलेक्ट्रीक गाड्यांची क्रेझ आहे. टाटा नॅक्सन ही त्यातही आघाडीवर आहे. अशातच ज्या नॅनो कारमधून रतन टाटांनी ताजमध्ये दिमाखात इन्ट्री केली ही नॅनोदेखील इलेक्ट्रीक होती. ही कस्टमाईज कार खास रतन टाटा यांनी आपल्यासाठी बनवून घेतली आहे. म्हणूनच ही गाडी आणखी खास ठरते. त्यामुळे आता लवकरच टाटा नॅनो ही देखील इलेक्ट्रीक वर्जनमध्ये बाजारात येणार आहे की काय? याचीही चर्चा रंगली आहे.