महाराष्ट्र । विशेष प्रतिनिधी । दि.१९ मे । एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवैसी (Akbaruddin Owaisi) यांनी काही दिवसांपूर्वी औरंगाबादमध्ये औरंगजेबाच्या कबरीला (Aurangzeb tomb) भेट दिली. त्यावरुन मोठा वाद निर्माण झाला असतानाच आता भारतीय पुरातत्व विभागाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
खुलताबाद येथील औरंगजेब समाधीवर विवाद सुरु असल्यामुळे दिल्ली येथील भारतीय पूरातत्व विभागाने याची गंभीर दखल घेऊन पत्र काढले आहे. यानुसार येत्या पाच दिवसांसाठी औरंगजेब मकबरेचं मुख्यद्वार पर्यटकांसाठी बंद करण्यात येणार आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी म्हणून बुधवार (18 मे) पासून पाच दिवसांसाठी औरंगजेब मकबरेचं मुख्यद्वार पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे.
तर मुख्य प्रवेश द्वारावर दोन सुरक्षा रक्षकांना भारतीय पूरातत्व विभागाच्या वतीने तैनात करण्यात आले आहेत. आगामी काळात परिस्थिती पाहता आणखी पाच दिवस बंद ठेवली जाऊ शकते असे ही या पत्रात नमूद करण्यात आला आहे.
सदरील पत्राची प्रत औरंगजेब मकबरेच्या व्यवस्थापक, पोलीस निरीक्षक, जिल्हाअधिकारी, ग्रामीण पोलिस अधीक्षक यांना ही पाठवण्यात आली आहे अशी माहिती भारतीय पूरातत्व विभागाचे अधिकारी राजेश वाकलेकर यांनी दिली आहे.
दोन दिवसांपूर्वी औरंगाबाद जवळील खुलताबाद येथे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. काही लोक औरंगजेबच्या कबरीवर चाल करून जाणार अशी अफवा पसरली होती. त्यामुळे लगेच कबरीचे मुख्य दार बंद करण्यात आले. अफवा नागरिकांच्या कानावर पडताच स्थानिक नागरिकही जमायला सुरुवात झाली होती.
याची माहिती मिळताच पोलिसांनीही तात्काळ औरंगजेबच्या कबरीकडे धाव घेतली. पोलिसांनी काही झाले नाही, काही होणार नाही, असे समजावत नागरिकांना तिथून बाहेर जाण्यास भाग पाडले आहे. आता कबरीवर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.