महाराष्ट्र २४-ऑनलाईन -मुंबई: येत्या ३० एप्रिलपर्यंत नागरिकांनी शिस्तीचे आणि सरकारी सूचनांचे काटेकोरपणे पालन केले तरच लॉकडाऊन उठवता येईल, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आणि प्रसार रोखण्यासाठी राज्यात ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आल्याची घोषणा केली होती. नागरिकांनी या निर्णयाला पाठिंबा आणि सहकार्य करावे, असे आवाहन अजित पवार यांनी केले.
राज्याच्या काही भागांत कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने सापडत आहेत. तिथला संसर्ग रोखण्यासाठी संबंधित गावे, वाड्या, वस्त्या, सोसायट्या सील केल्या जात आहेत. यामुळे सध्या गैरसोय होत असली तरी लोकांचा जीव वाचवण्यासाठी हे आवश्यक असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. ही टाळेबंदी यशस्वी झाली तर कदाचित पुन्हा टाळेबंदी वाढवावी लागणार नाही, याचे भान ठेवून नागरिकांनी सरकारला सहकार्य करावे, असेही अजित पवार यांनी सांगितले