महाराष्ट्र २४-ऑनलाईन -वॉशिंग्टन : कोरोना विषाणूमुळे अमेरिकेत मृतदेह गाडायचे कुठे अशी समस्या निर्माण झाली आहे. कारण कोरोनामुळे अमेरिकेत रोज मृतांच्या संख्येत धक्कादायक वाढ होत आहे. अमेरिका आता जगातील एकमेव असा देश बनला आहे जेथे एका दिवसात दोन हजाराहून अधिक लोक मरण पावले आहेत. अमेरिकेत गेल्या 24 तासांत 2108 लोक मरण पावले आहेत. कोरोना विषाणूच्या संसर्गावर नजर ठेवणारी संस्था जॉन हॉपकिन्स विद्यापीठाने ही आकडेवारी जाहीर केली आहे. गुरुवारी अमेरिकेत सुमारे 1700 लोकं मरण पावले.
शुक्रवारी जगभरात कोरोना विषाणूमुळे मृतांचा आकडा एक लाखांच्या पुढे गेला आहे. शुक्रवारी जगभरात संक्रमित झालेल्यांची संख्या सुमारे 17 लाखांवर पोहोचली आहे, तर मृतांचा आकडा एक लाख 2 हजारांवर पोहोचला आहे.
न्यूयॉर्क हे अमेरिकेत हॉटस्पॉट बनले आहे. या शहरातील 1.6 दशलक्ष लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. येथे कोरोनामुळे 5820 लोक मरण पावले आहेत. तर संपूर्ण अमेरिकेत 5 लाखाहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत की, अमेरिकेत कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या 100000 पेक्षा कमी असेल. यापूर्वी ट्रम्प प्रशासनाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने असे म्हटले होते की, अमेरिकेत कोरोना विषाणूमुळे दोन लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू होऊ शकतो.