महाराष्ट्र । विशेष प्रतिनिधी । दि.२४ मे । भारताचा मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कराचीमध्ये लपून बसल्याची चर्चा अनेक वर्षांपासून सुरु आहे. त्यावर आता शिक्कामोर्तब खुद्द दाऊदच्या भाच्यानेच केला आहे. त्यामुळे पाकिस्तानचा बुरखा फाटला आहे. दाऊदचा भाचा म्हणजेच हसीना पारकरचा मुलगा अलीशाह पारकर याने अंमलबजावणी संचालनालयकडे (ईडी) आपला मामा म्हणजेच कुख्यात गुंड दाऊद पाकिस्तानात कराचीमध्ये असल्याची कबुली दिली आहे. तसेच दाऊदचे कुटुंब सणासुदीच्या दिवशी आमच्या संपर्कात होता अशी देखील माहिती अलीशाहने दिल्याने खळबळ माजली आहे.
अलीशाह पारकरने ईडीला सांगितले की, १९८६ ला दाऊदने भारत सोडला आणि फरार झाला. त्यांनतर जाणकर सूत्रांकडून दाऊद पाकिस्तानात राहत असल्याची माहिती मिळाली आहे. दाऊद इब्राहिमला संयुक्त राष्ट्रांनी जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले आहे.
अलीशाह पारकर याने ईडीला पुढे सांगितले की, दाऊद इब्राहिम हा माझा मामा आहे. दक्षिण मुंबईतील डंबरवाला इमारतीच्या चौथ्या मजल्यावर ते १९८६ पर्यंत राहत होते. जरी मी काही स्त्रोतांकडून आणि नातेवाईकांकडून ऐकले आहे की, तो आता कराचीमध्ये आहे. पुढे पारकर म्हणाला, जेव्हा दाऊद कराचीला गेला होता. तेव्हा माझा जन्मही झाला नव्हता. आता मी किंवा माझे कुटुंब त्यांच्या संपर्कात नाही. होय, पण कधी-कधी ईद, दिवाळी किंवा इतर कोणत्याही सणाच्या निमित्ताने तो पत्नी मेहजबीन दाऊद इब्राहिमचा संपर्क होतो. तो माझी पत्नी आयशा आणि माझ्या बहिणींच्या संपर्कात असतो.
दाऊद इब्राहिम भारतातील अनेक दहशतवादी प्रकरणांमध्ये वॉण्टेड असून, त्याचा अनेक दिवसांपासून शोध सुरू आहे. यापूर्वी, राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) 13 मे रोजी शहराच्या पश्चिम उपनगरातून गँगस्टर छोटा शकीलच्या दोन साथीदारांना फरारी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमद्वारे चालवल्या जाणार्या गुन्हेगारी सिंडिकेटचे बेकायदेशीर कारवाया आणि आर्थिक व्यवहार हाताळल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. आरिफ अबुबकर शेख (59) आणि शब्बीर अबुबकर शेख (51) अशी त्यांची नावे आहेत.
एनआयएने अनेक ठिकाणी छापे टाकले होते, दोन्ही आरोपींचे छोटा शकीलशी जवळचे संबंध आहेत. नुकत्याच मुंबई आणि ठाण्यात विविध ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये एनआयएने तपासासाठी अनेक संशयितांचा शोध घेतला होता. डी कंपनीशी (दाऊद इब्राहिमचे गुन्हे सिंडिकेट) संबंध असल्याबद्दल अटक करण्यात आलेल्या संशयितांमध्ये आरिफ आणि शब्बीर यांचाही समावेश आहे. मोस्ट वाँटेड दाऊद इब्राहिमच्या साथीदारांविरुद्ध तपास यंत्रणांनी काही काळापूर्वी मुंबई आणि शेजारच्या ठाणे जिल्ह्यात 20 हून अधिक ठिकाणी छापे टाकले होते. आरिफ आणि शब्बीर यांच्या चौकशीदरम्यान, एनआयए टीमला या दोघांचे छोटा शकीलसोबत काही व्यवहार असल्याचे आढळले, त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. छोटा शकील पाकिस्तानातून आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी सिंडिकेट चालवतो. शकीलचा खंडणी, अंमली पदार्थांची तस्करी आणि दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग आहे.