IPL 2022 : ढिसाळ क्षेत्ररक्षणाने लखनऊचा पराभव, कॅप्टन राहुलही ठरला जबाबदार

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २६ मे । आयपीएल 2022 मध्ये पहिल्यांदाच खेळत असलेल्या लखनऊ सुपर जायंट्सचं (Lucknow Super Giants) स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. बुधवारी झालेल्या एलिमेनेटर सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बँगलोरनं लखनऊचा 14 रननं पराभव केला. 14 पैकी 9 सामने जिंकत लखनऊनं ‘प्ले ऑफ’ मध्ये प्रवेश केला होता. त्यांना ‘प्ले ऑफ’ मधील पहिल्याच सामन्यात चौथ्या क्रमांकावर असलेल्या आरसीबीनं पराभूत केलं. लखनऊच्या खेळाडूंनी निर्णायक क्षणी केलेल्या 2 चुका त्यांच्या पराभवाचं कारण ठरल्या.

लखनऊ सुपर जायंट्सनं या सामन्यात टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. आरसीबीनं निर्धारित 20 ओव्हरमध्ये 4 आऊट 207 रन केले. आरसीबीच्या या मोठ्या स्कोरमध्ये लखनऊच्या फिल्डर्सचे मोठे योगदान होते. त्यांनी फक्त पाच बॉलमध्ये दोन कॅच सोडत आरसीबीला मदत केली.

आरसीबीच्या इनिंगमधील 15 व्या ओव्हरमध्ये पहिली चूक झाली. त्यापूर्वीच्या 14 ओव्हरमध्ये आरसीबीनं 117 रन केले होते. लखनऊकडून मोहसीन खाननं 15 वी ओव्हर टाकली. त्या ओव्हरच्या पाचव्या बॉलवर दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) मोठा फटका लगावण्यात अपयशी ठरला. कार्तिकनं मारलेला बॉल पकडण्याची संधी कॅप्टन केएल राहुलला (KL Rahul) होती, पण राहुलला तो कॅच पकडता आला नाही.

त्यानंतर पुढच्या ओव्हरमध्ये रजत पाटीदारनं (Rajat Patidar) मिडविकेटला पुल शॉट खेळला. त्यानं मारलेला बॉ़ल दीपक हुडाच्या हाताला लागून बाऊंड्रीच्या बाहेर गेला. हुडानं पाटीदारचा सोपा कॅच सोडला त्यावेळी तो 72 रन काढून खेळत होता. त्यानंतर पाटीदारनं नाबाद 112 रनची खेळी केली. पाटीदार आणि कार्तिक यांच्यात 41 बॉलमध्ये नाबाद 91 रनची पार्टनरशीप झाली, ज्यामुळे लखनऊला विजयासाठी 208 रनचं आव्हान मिळालं. सलग दोन ओव्हरमध्ये लखनऊनं केलेल्या या चुकांमुळेच त्यांना ही पार्टनरशिप करता आली. या चुकाच लखनऊचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आणण्यासाठी निर्णयाक ठरल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *