Monsoon 2022 : महाराष्ट्रात कधी दाखल होणार मान्सून? हवामान खात्याने सांगितली तारीख

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३१ मे ।यंदाचा मान्सून पुढे प्रवास करत आता केरळमध्ये दाखल झाला आहे. यामुळे राज्यासाठीही शुभवार्ता आहे. १६ मे रोजी अंदमानमध्ये दाखल झालेला मान्सून अखेर २९ मे रोजी केरळमध्ये दाखल झाला. त्यामुळे आता राज्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. अशात ६ ते १० जून या काळात महाराष्ट्रात मान्सून बरसेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.

सध्या मान्सून अरबी समुद्राचा मध्य भाग, केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटकाच्या काही भागात दाखल झाला आहे. राज्यात पुढील चार दिवस दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील लगतच्या काही भागात गडगडाटासहसह पाऊस पडण्याची शक्यता आहे, असं होसाळीकर यांनी ट्वीट करत म्हटलं होतं. त्यानुसार, आज राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे.

दरम्यान, सोमवारपासून राज्यात मान्सूनपूर्व पावसाची शक्यता असल्याने महाराष्ट्रात आता उष्णतेपासून दिलासा मिळणार आहे. भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) नुसार, या आठवड्यात, मुंबईसह राज्यातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये मधूनमधून पाऊस आणि मेघगर्जनेसह अंशतः ढगाळ आकाश दिसेल.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात किमान ४ ते ५ दिवस अगोदर मान्सून दाखल होऊ शकतो. दुसरीकडे, राज्यातील हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक बहुतांश शहरांमध्ये ‘उत्तम ते मध्यम’ श्रेणीत नोंदवला जात आहे. या आठवड्यातही तो त्याच श्रेणीत राहण्याची अपेक्षा आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *