लालपरी लवकरच विजेवर धावणार ! नियोजन सुरू असल्याची अजित पवार यांची माहिती

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३ जून । राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व तीन हजार गाडय़ा विजेवर करण्यात येणार असून त्यासाठीचे आर्थिक नियोजन राज्याच्या अंदाजपत्रकात करण्यात आले आहे. गाडय़ा विजेवर करण्याची आवश्यक ती सर्व कार्यवाही सुरू आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे दिली. एसटीच्या पुणे विभागाअंतर्गत शिवाई या विजेवर धावणाऱ्या बससेवेचा प्रारंभ आणि विद्युत प्रभारक केंद्राचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमात त्यांनी ही माहिती दिली. एसटीची सेवा सुरू झाल्यानंतर पुणे-नगर या मार्गावर पहिली गाडी धावली होती. याच मार्गावर विजेवर धावणारी पहिली गाडी बुधवारी धावली.

एसटीच्या माध्यमातून सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण सेवा देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. गुणवत्ता वाढीसाठी नवीन बदल स्वीकारण्यात येत आहेत. प्रदूषण विरहित, आवाज विरहित शिवाई बस त्यासाठी प्रवाशांच्या सेवेत आणण्यात आली आहे. समाजातील सर्व घटकांना एसटीची सेवा आपली वाटली पाहिजे, यासाठी सर्व सोयी-सुविधा देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. निमआराम, वातानूकुलित, अश्वमेध, शिवनेरी अशा बस सुरू करण्यात आल्या. त्यानंतर शिवशाही बस सेवेत समाविष्ट करण्यात आली. शिवाई गाडीत प्रवाशांच्या मनोरंजनासाठी वायफाय यंत्रणा देण्यात आली आहे. येत्या काळात प्रत्येक आगारात विद्युत प्रभारक केंद्र स्थापन करण्यात येईल. राज्य शासन त्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करेल, असे अजित पवार यांनी सांगितले.

 

राज्य परिवहन महामंडळाची बससेवा हा राज्याच्या प्रगतीचा अविभाज्य घटक होती आणि भविष्यातही राहील, राज्याचे भविष्य घडविण्याचे आणि संस्कृती जपण्याचे काम एसटीने केले, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या अमृतमहोत्सवी कामगिरीचा गौरव केला. महामंडळाचा अमृतमहोत्सवी वर्ष पदार्पण सोहळा बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी दूरचित्र संवाद प्रणालीद्वारे ठाकरे यांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली.

शिवाईची वैशिष्टय़े

* शिवाई गाडी विजेवर धावणारी आहे. प्रदूषण विरहित, पर्यावरण पूरक, वातानुकूलित आणि आवाज विरहित ही या गाडीची वैशिष्टय़े आहेत.

* आकर्षक रंगसंगतीमध्ये शिवाई नाव देण्यात आले आहे. गाडी एकदा चार्ज झाल्यानंतर जास्तीत जास्त २५० किलोमीटर धावते.

* प्रत्येक प्रवाशासाठी स्वतंत्र आणि स्वनियंत्रित वातानूकुलित यंत्रणा असून गाडीची आसन क्षमता ४३ प्रवासी एवढी आहे.

* मोबाइल चार्जिगचीही सुविधा असून चालक कक्षात प्रवासी घोषणा यंत्रणा आहे. प्रवासी कक्षातील हालचालींवर देखरेख करण्यासाठी कॅमेरा असून गाडीमध्ये टीव्ही बसविण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *