केंद्र सरकारचा ” हा ” निर्णय सर्व सामान्यांच्या जिव्हारी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३ जून । इंधनाच्या वाढत्या दरांमुळे आधीच महागाईचे चटके सोसत असलेल्या सर्वसामान्य नागरिकांना केंद्र सरकारने आणखी एक झटका दिला आहे. स्वयंपाकाच्या गॅससाठी (एलपीजी) प्रतिसिलिंडर मिळणारे अनुदान (सबसिडी) सरकारने इतिहासजमा केले आहे. गेले काही महिने हे अनुदान ग्राहकांच्या खात्यावर जमा होत नसल्याची ओरड होत आहे. मात्र, आता हे अनुदान भावी काळात सुरू होण्याची शक्यता मावळली आहे. यापुढे स्वयंपाकाच्या एलपीजी सिलिंडरवर दिले जाणारे हे अनुदान केवळ उज्ज्वला योजने अंर्गत येणाऱ्या नऊ कोटी गरीब महिला लाभार्थ्यांनाच देण्याचे सरकारने ठरवले आहे. त्यामुळे देशातील लाखो ग्राहकांना यापुढे बाजारभावाने स्वयंपाकाचे गॅस सिलिंडर खरेदी करावे लागणार आहे.

केंद्रीय तेल सचिव पंकज जैन यांनी गुरुवारी यासंदर्भात माहिती दिली. केंद्र सरकारने जून २०२०पासून स्वयंपाकाच्या एलपीजी सिलिंडरसाठी अनुदान दिलेले नाही. केवळ केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घोषित केलेले अनुदान २१ मार्च रोजी एकदाच देण्यात आले. करोना संसर्गाच्या पहिल्या लाटेपासून एलपीजी गॅसधारकांना अनुदान दिले जात नसल्याचे पंकज जैन म्हणाले. मात्र, केवळ उज्ज्वला योजने अंतर्गत एलपीजी सिलिंडर मिळालेल्या लाभार्थी महिलांनाच हे अनुदान दिले जात आहे.

सीतारामन यांची घोषणा

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अलीकडे पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात प्रतिलिटर आठ रुपये आणि डिझेलवरील उत्पादनशुल्कात प्रतिलिटर सहा रुपये कपात केली. त्याचवेळी उज्ज्वला योजनेअंतर्गत स्वयंपाकाचा एलपीजी सिलिंडर मिळणाऱ्या लाभार्थी महिलांना १२ सिलिंडरसाठी प्रतिसिलिंडर २०० रुपयांचे अनुदान मिळेल, अशी घोषणाही त्यांनी केली होती. या अनुदानामुळे सरकारला ६,१०० कोटी रुपयांची तरतूद करावी लागणार आहे.

असे बंद झाले अनुदान

इंधनाचा प्रकार अनुदान बंद

पेट्रोल जून २०१०

डिझेल नोव्हेंबर २०१४

केरोसिन फेब्रुवारी २०२०

एलपीजी सिलिंडर जून २०२०

अनुदान हे अधिक काळ लाभ देण्यासाठी किंवा सातत्याने वाढवत नेण्यासाठी तयार करण्यात आलेले नाही. किंबहुना अनुदान हे उत्तरोत्तर कमी होणेच अपेक्षित आहे.

– हरदीप पुरी, केंद्रीय पेट्रोलियममंत्री

जोडण्या आणि दरवाढ

– देशात ३०.५ कोटी एलपीजी जोडण्या

– उज्ज्वला योजने अंतर्गत नऊ कोटी एलपीजी जोडण्या

– गेल्या सहा महिन्यांत एलपीजीचे दर सात टक्क्यांनी वाढले

– जून २०२१मध्ये १४.२ किलोचा एलपीजी सिलिंडर ८०९ रुपयांना उपलब्ध होत असे. पुढील चार महिन्यांत या दरात ९० रुपयांची वाढ झाली

– एलपीजीच्या दरात यावर्षी मार्चमध्ये ५० रुपये प्रतिसिलिंडर वाढ करण्यात आली. त्यानंतर मे महिन्यात ३.५० रुपयांची वाढ केली गेली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *