Monsoon Update : राज्यात यंदा ‘सामान्यापेक्षा जास्त’ पाऊस ? काय आहे हवामान विभागाचा अंदाज ?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३ जून । भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) महाराष्ट्रात ‘सामान्यपेक्षा जास्त’ मान्सूनचा अंदाज वर्तवला आहे. जूनमधील पाऊसही सामान्य श्रेणीत राहण्याची शक्यता आहे. हवामान शास्त्रज्ञांनी नमूद केले आहे, की मान्सून 5 जूनपर्यंत महाराष्ट्राच्या दक्षिण भागात पोहोचू शकेल, परंतु राज्यभर त्याची प्रगती उशिरा होण्याची शक्यता आहे. एका ऑनलाइन पत्रकार परिषदेत बोलताना, IMDचे डायरेक्टर-जनरल मेटरॉलॉजी (DGM), मृत्युंजय महापात्रा म्हणाले, की मान्सून 5 जूनच्या आसपास महाराष्ट्रात पोहोचू शकतो. नैऋत्य मोसमी पावसाची प्रगती मंद असेल आणि त्यामुळे आम्हाला अचूक तारखेचा अजून अंदाज आलेला नाही. दुसरीकडे राज्याच्या अनेक भागांमध्ये मान्सूनपूर्व पाऊस (Pre-monsoon rain) चांगला पडण्यास सुरुवात होईल, असेही ते म्हणाले. ते पुढे म्हणाले, की मान्सून हंगाम जो जून ते सप्टेंबर पर्यंत असतो, तो सामान्यापेक्षा जास्त असेल.

पुण्यातही अधिक पाऊस
विविध हवामान अंदाज मॉडेल्सनुसार, हे स्पष्ट आहे, की मान्सूनच्या काळात, मध्य भारतात, ज्यामध्ये महाराष्ट्र आणि पुण्याचा समावेश आहे, पाऊस सामान्य किंवा सामान्यपेक्षा जास्त असेल. हवामान खात्याने भारतातील मान्सूनचा अंदाजही अपडेट केला आहे. परिणामी, मध्य भारतात, दीर्घ कालावधीच्या सरासरीच्या (LPA) 106% मान्सून असेल असा अंदाज IMDने वर्तवला आहे.

तर भारतासाठी मान्सून सरासरीच्या 103% असेल, असे महापात्रा म्हणाले. IMDनुसार, पुणे शहरात 1 मार्च ते 31 मेपर्यंत 44.3 मिलिमीटरने मान्सूनपूर्व पावसाची कमतरता नोंदवली गेली आहे. या काळात पुणे शहरात फक्त 1.9 मिमी पाऊस झाला आहे.

वातावरण आल्हाददायक
जून महिन्यासाठी, महाराष्ट्रात पाऊस सामान्य ते सामान्यापेक्षा जास्त राहील, असे महापात्रा यांनी सांगितले. महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये जून महिन्यात कमाल आणि किमान तापमान सामान्यपेक्षा कमी राहील. राज्यातील बहुतांश भागात हवामान आल्हाददायक राहण्याची शक्यता आहे, असेही त्यांनी सांगितले आहे.

ते पुढे म्हणाले की, एकूणच, भारतातील पावसाच्या प्रदेशात मान्सून चांगला राहण्याची शक्यता आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. अनेक ठिकाणी पाण्याअभावी पिकांचे मोठे नुकसान सोसावे लागते. यंदाच्या पावसामुळे या समस्येत काही अंशी शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *