महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३ जून । ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांनी राज्यकारभार हाती घेऊन 70 वर्षे लोटली आहेत. यानिमित्ताने ब्रिटनमध्ये उत्सवाची तयारी सुरू झाली आहे. त्याची सुरुवात गुरुवारी पोलीस बँड ड्रग बीटिंग समारंभाने होत आहे. हा समारंभ रविवारपर्यंत चालेल. त्यावेळी शाही संचलन होईल. पथ संचलनात सोन्याची घोडागाडी सहभागी होईल.
शाही बग्गी 260 वर्षांपूर्वीच्या तीन घोडागाडींपैकी आहे. 23 फूट लांब, 12 फूट उंच ही घोडागाडी 1762 साली तयार करण्यात आली होती. बग्गीचे वजन 4 टन आहे. या घोडागाडीची चाके अक्रोडाच्या लाकडाची आहेत. लाकडाला सोन्याने मढवलेले आहे. हे सुशासनाचे प्रतीक मानले जाते. दारे व खिडक्या ताडापासून बनवलेल्या आहेत. 2002 मध्ये महाराणी एलिझाबेथ यांच्या कारभाराला 50 वर्षे पूर्ण झाली होती. त्यावेळी त्या बग्गीत महाराणी स्वार होऊन निघाल्या होत्या.