महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३ जून । आगामी काही दिवसांमध्ये रिलायन्सचा खेळणी उद्योगामध्ये दबदबा वाढणार असल्याचे संकेत आहेत. रिलायन्स ब्रँड्स लिमिटेड (आरबीएल) यांनी भारतात खेळण्यांची निर्मिती करुन या व्यवसायाला मजबूती देण्यासाठी प्लास्टिक लेग्नो एसपीएसोबत संयुक्त करारावर स्वाक्षरी केली आहे.
वरीलप्रमाणे व्यूहरचना आखत आरबीएलला प्लास्टिक लेग्नोच्या खेळणी निर्मिती व्यवसायाची 40 टक्के हिस्सेदारी मिळणार आहे. प्लास्टिक लेग्नो एसपीएचा प्रमुख इटली येथील सुनिनो समूह आहे. जो युरोपमध्ये जवळपास 25 वर्षांपासून खेळण्यांची निर्मिती करत या व्यवसायात कार्यरत आहे.
या बातमीमुळे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे समभाग गुरुवारी जवळपास 3 टक्क्यांपेक्षा अधिक तेजीत राहिले. आरआयएलचास समभाग गुरुवारी 2,634 रुपयावर खुला झाला. व्यवसायादरम्यान त्यांनी 2,719 रुपयांचा उच्चांक व 2,634.00 रुपयांचा निच्चांकी स्तर गाठल्याचे दिसून आले
सुनिनो समूहाने 2009 मध्ये भारतामध्ये आपला व्यवसाय सुरु केला होता. रिलायन्स रिटेल वेंचर्सच्या पूर्ण मालकीची असणारी कंपनी आरबीएलचा खेळणी उद्योग मजबूत तेजी पकडत आहे. याच्या पोर्टफोलियोमध्ये हॅमलीज व देशातील ट्राय ब्रँड रोव्हनचा समावेश आहे.
आरबीएलच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार जागतिक अव्वल दर्जाच्या खेळणी निर्मितीमध्ये प्लास्टिक लेग्नोचा अनुभव दांडगा असून याचा लाभ आगामी काळात संयुक्तपणे व्यवसाय वाढीसाठी होणार आहे तसेच खेळणी व्यवसायाचा विस्तार सर्वदूर करण्यासाठीही एकत्रित प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.