Heat Wave : विदर्भात पुढील तीन दिवस उष्णतेच्या लाटेची शक्यता

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ४ जून । वेळेआधीच केरळमध्ये दाखल झालेला मान्सून (monsoon) पुढच्या दोन दिवसांत कोकणात दाखल होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. परंतु, राज्यात काही ठिकाणी अद्यापही उष्णतेची लाट कायम आहे. कर्नाटकमधील कारवारमध्येच मान्सून रेंगाळल्यामुळे महाराष्ट्रात मौसमी वारे कधी येणार? असा प्रश्न निर्माण झालाय. असे असतानाच विदर्भात पुढील तीन दिवस उष्णतेच्या लाटेची शक्यता हवामान विभगाने (IMD) वर्तवली आहे.

जून महिना सुरू झाला असताना देखील अंगाची लाहीलाही होत आहे. विदर्भात अद्यापही उष्णतेचा तीव्र तडाखा जाणवतोय. विदर्भातील अनेक भागात पुढील तीन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय. दक्षिण महाराष्ट्रात होणाऱ्या पूर्वमौसमी पावसाचा देखील जोर कमी आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातही तापमान चाळीशी पार आहे. त्यामुळे मान्सून महाराष्ट्रात कधी दाखल होणार? असा प्रश्न आता सर्वांना पडलाय. असे असतानाच भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील पाच दिवसांत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

जून महिना सुरू झाल्यानंतर तरी पाऊस पडेल किंवा तापमान कमी होईल असे वाटत होते. पण कालचा दिवस हा नागपूरसाठी अजूनच दाहक ठरला. या सीझनचा तापमानाचा उच्चांक काल नागपुरात नोंदवला गेला आहे. नागपुरात काल 46.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर चंद्रपुरात काल 46.4 तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे नागपूरकरांना येणारा संपूर्ण आठवडा उष्ण तापमानाला सामोरे जावे लागणार आहे.

केरळमध्ये 29 मे रोजी मान्सून दाखल झाला आहे. त्यानंतर 31 मे रोजी मान्सून कर्नाटकच्या कारवापर्यंत पोहोचला आहे. परंतु, नैऋत्य वाऱ्यांसाठी अनुकूल परिस्थिती नसल्यामुळे मान्सून कर्नाटकातच रेंगाळलाय. तिथे देखील पावसाचा जोर अधिक नसून 7 जून नंतर पावसाचा जोर दक्षिण भारतात वाढेल असा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलाय.

तळकोकणात मान्सून 8 ते 9 जून रोजी दाखल होण्याचा अंदाज आहे. तर मुंबई 12 जूनपर्यंत दाखल होण्याची शक्यता आहे. 8 जूननंतर मुंबईत पूर्वमौसमी पावसाचा जोर बघायला मिळेल. मात्र, पुढील आठवड्यात देखील पावसाचा हवा तसा जोर नसणार आहे. राज्यात काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी उन्हाचा तडाखा कायम राहणार आहे.

दक्षिण भारतात 7 जूननंतर पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलाय. त्यानंतर महाराष्ट्रातही पावसाची शक्यता आहे. मात्र, नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा जोर कमकुवत असल्यामुळे जूनच्या पहिल्या पंधरवड्यात पावसाची वाटच बघावी लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *