महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ४ जून । मराठी चित्रपट व नाटय़सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा शनिवारी 4 जून रोजी 75 वा वाढदिवस आहे. त्यांच्या अभिनय क्षेत्रातील कारकीर्दीलाही 50 वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने आज अशोक सराफ यांचा विशेष सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता . हा कार्यक्रम शिवाजी मंदिर, दादर येथे सकाळी 10.30 वाजता झाला .
अशोक सराफ म्हणजे अभिनय क्षेत्राला मिळालेले रत्न आहे. आपल्या अभिनयाने त्यांनी केवळ मराठी सिनेनाटय़ इंडस्ट्रीच नव्हे, तर हिंदी चित्रपटसृष्टीतही आपली छाप सोडली आहे. त्यांच्या भूमिका, अचूक टायमिंग आणि डायलॉग चाहत्यांच्या डोक्यात आजही फिट्ट आहेत. इंडस्ट्रीत त्यांना अशोकमामा म्हणून संबोधले जाते. वयाच्या अमृतमहोत्सवी वर्षातही त्यांच्या अभिनयाचे नाणे खणखणीत वाजत आहे. ते सध्या ‘अष्टविनायक’ संस्थेच्या ‘व्हॅक्यूम क्लीनर’ या नाटकात प्रमुख भूमिका साकारत आहेत. .
झी टॉकीजने अशोक सराफ यांच्या चित्रपटांचा नजराणा प्रेक्षकांसाठी आणला आहे. 4 जूनला सकाळी 10.30 वाजता ‘आलटून पालटून’, दुपारी 1 वाजता ‘धूमधडाका’, दुपारी 4.30 वाजता ‘बाळाचे बाप ब्रह्मचारी’ हे चित्रपट दाखवले जाणार आहेत.
या नाटकात अशोक सराफ यांच्यासोबत अभिनेत्री निर्मिती सावंत यांची प्रमुख भूमिका आहे. चिन्मय मांडलेकर यांनी या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन केले आहे. कोरोनाचा काळ वगळता गेली चार वर्षे ‘व्हॅक्यूम क्लीनर’ हे नाटक रंगभूमीवर जोरात सुरू आहे. महाराष्ट्र, गोवा, इंदूर आदी ठिकाणी या नाटकाचे आतापर्यंत 300 हून अधिक प्रयोग झाले आहेत.
अशोक सराफ यांच्यासारख्या सहृदयी व गुणी कलाकाराचा त्यांच्या पंचाहत्तरीनिमित्त सन्मान करण्याचा योग ‘अष्टविनायक’ संस्थेच्या परिवाराला मिळत आहे हे आमचे भाग्यच आहे, असे मत या नाटय़ संस्थेचे ज्येष्ठ निर्माते दिलीप जाधव यांनी व्यक्त केले.