मशागत पूर्ण; पाऊस नसल्याने शेतकरी चिंतेत

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ७ जून । नगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातारण आहे. मात्र, पावसाने दडी मारल्याचे चित्र आहे. पावसाची शक्यता समोर ठेवून ग्रामीण भागातील सर्वच परिसरातील शेतकरी शेतीच्या मशागतीची कामे पूर्ण करून चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहत असून, पाऊस पडण्याची चिन्हे दिसत नसल्याने बळीराजा चिंतातूर झाला आहे.

हवामान खात्याने व विविध भाकिताने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पावसाचे वेळेत आगमन होईल व सरासरी इतका पाऊस होईल, असे भाकीत केले होते. मात्र, सद्यस्थितीत पावसाची चिन्हे दिसून येत नाही. मे महिन्यातच मान्सूनपूर्व सरींचे आगमन होऊन पाऊस पडण्यासाठी वातावरणनिर्मिती खऱ्या अर्थाने होत असते.

मात्र, यावर्षी परिस्थिती वेगळी असून, मे महिन्यात अतिउष्णतेचा सामना करावा लागला असताना जून महिन्यातही उन्हाची तीव्रता ‘जैसे थे’ असून, अधूनमधून ढगाळ वातावरण, सोसाटय़ाचा वारा वाहत असून, रात्री थंडगार हवा असे निसर्गाचे चित्र या भागात पाहण्यास मिळत आहे.

मागील दोन वर्षांत बळीराजाला निसर्गाने चांगली साथ दिली, त्यात आजतागायत या भागात पाण्याची पातळी बऱ्यापैकी टिकून राहण्यास मदत झाली. मागील काळात पाऊस वेळेवर पडला तर त्यात अतिवृष्टीही झाली. त्यात पिके मातीमोल झाली तरीही बळीराजा डगमगला नाही. कारण, खरीप हंगाम वाया गेला, तरी रब्बी हंगामातील पिकांना पाणीपातळीत वाढ झाल्याने फायदा होईल, ही आशा बाळगून शेती व्यवसाय करण्यावर भर दिला आहे. परंतु यावर्षी जून महिन्यात पाऊस पडण्याची चिन्हे धूसर दिसू लागल्याने शेतकऱ्यांच्या आशेवर पूर्णपणे पाणी फिरले आहे.

गेल्या काही वर्षांत पावसाची अनियमितता व दुबार पेरणी संकट या गोष्टीमुळे बळीराजा मेटाकुटीला आला आहे. परंतु, मागील दोन वर्षांत चांगले पर्जन्यमान झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, यंदा पावसाने बळीराजाच्या आनंदावर पूर्णपणे विरजण घातले असून, विहिरी व बोअरवेलने तळ गाठले आहे. त्यात उन्हाळ्याची तीव्रता कायम असल्याने शेतीतील ऊस, फळबाग व पशुसंवर्धनाचा चारा-पिकांची तहान अजून वाढली आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी चातकाप्रमाणे पावसाची आतुरतेने वाट पाहात आहे.

बियाणांच्या दरात मोठी वाढ

सोयाबीन बियाणाच्या 30 किलोच्या बॅगचे दर जवळपास चार हजार सातशे रुपये झाले असून, त्यात मागील वर्षांच्या तुलनेत एक हजार रुपये इतकी दरवाढ झाली आहे. त्यानंतर कपाशी 810 रुपयांमध्ये 450 ग्रॅम बियाणे मिळत आहे. त्यातदेखील मागील वर्षाच्या तुलनेत 50 ते 60 रुपये वाढ झाली आहे. रानडुकरांमुळे शेतकरी मका पीक घेण्यास टाळाटाळ करताना दिसत आहे. रासायनिक खते, तणनाशके, औषधांच्या किमतीत मागील वर्षीच्या तुलनेत यंदामोठी वाढ दिसून येत असून, सोयाबीन व कपाशी क्षेत्र वाढणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *