महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – नवी दिल्ली: करोना व्हायरसमुळे क्रिकेट सामने स्थगित झाले असेल तरी मैदानाबाहेरची फटकेबाजी सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून आयपीएल, धोनीची निवृत्ती आदी विषयांवर विविध खेळाडू मत व्यक्त करत आहेत. करोनामुळे लॉकडाऊनचा कालावधी वाढल्यामुळे आयपीएलचा १३वा हंगाम न होण्याची शक्यात आधिक आहे. यामुळेच धोनीचे भारतीय संघात परत येणे अवघड असल्याचे मानले जात आहे.
आयपीएल रद्द झाल्यास महेंद्र सिंह धोनीला भारतीय संघात घेणे अवघड होईल. त्याच बरोबर त्याला कोणत्या आधारावर संघात स्थान देणार असा सवाल भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने उपस्थित केला.
धोनी आयपीएलच्या माध्यमातून क्रिकेट मैदानावर परतणार होता. पण चीनमधून जगभर पसरलेल्या करोना व्हायरसमुळे जगातील सर्वात श्रीमंत अशी क्रिकेट लीग स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. देशात करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आयपीएलच्या आयोजनावर शंकाच आहे.