महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ७ जून । पावसाळा म्हणजे सृजनाचा काळ. तप्त उन्हाळा अंगावर काढल्यानंतर धरणीही तुषांराची प्रतीक्षा करीत असते. मृग लागताच पावसाळ्याला खरी सुरूवात होते. वृक्षही कात टाकतात. वातावरणात गारवा पसरतो. नद्या-नाले तुडूंब भरून वाहतात. असा हा पावसाळा क्षुधा शमन करणारा असला तरी सोबत रोगराई घेऊनही येतो. रोगराई पसरविण्यात उघड्या खाद्यपदार्थांचा मोठा वाटा असतो. त्यामुळे आरोग्य सांभाळण्यासाठी उघड्यावरील अन्न आणि खाद्यपदार्थ टाळण्याची गरज आहे.
पावसाळ्यात आरोग्याची काळजी घेताना, दूषित पाणी पिणे तसेच उघड्यावरचे पदार्थ खाणे टाळावे . पावसाळ्यात अनेकदा पिण्याचे पाणीही दूषित होते. ते पाणी घेतल्यास कॉलरा, विषमज्वर, गॅस्ट्रो या आजारांचा प्रामुख्याने प्रादुर्भाव होतो. उघड्यावरील खाद्यपदार्थांमुळे उलट्या, जुलाब, कावीळ होण्याची शक्यता आहे. किंबहुना पावसाळ्यात या आजाराचे प्रमाण वाढते, त्यामुळे म्हणून नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे.