महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – मुंबई : महाराष्ट्रातील लॉकडाउन व्यवस्थेचा फेरआढावा उद्या (ता. १३) घेतला जाणार असून शेतीची कामे बहुतांश सर्व जिल्ह्यात सुरू करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कृषीकामे आता सुरू करण्याशिवाय पर्याय नसल्याने संसर्गाची लागण न झालेल्या गावात त्याबद्दलची परवानगी देणारा निर्णय जारी करण्यात येईल. पावसाळ्यापूर्वी आवश्यक असणारी कामेही सुरू केली जाणार असून त्याबद्दलचा आदेश उद्याच्या बैठकीत घेतला जाईल. सोशल डिस्टन्सिंग पाळू शकतील अशा कामांच्या याद्या संबंधित खात्याच्या सचिवांनी तयार कराव्यात आणि त्या कामांना सवलत मिळू शकेल काय यावर विचार केला जाईल.
मॉन्सूनचे आगमन जूनच्या पहिल्या आठवडयात होण्याची शक्यता गृहित धरून पावसाळी कामे सुरू केली जाणार आहेत. ज्या भागात बांधकामे अर्धवट अवस्थेत आहेत, तेथे मजूरांची काळजी घेण्याचे हमीपत्र घेवून कामे सुरू करण्याची परवानगी दिली जाईल. पाया खणून ठेवलेल्या बांधकामांना विशेषत्वाने परवानगी दिली जाणार आहे. शेतीची कामे सुरू झाली नाही अर्थव्यवस्थेला कोट्यवधीचा फटका बसेल आणि गावांची अर्थव्यवस्था दयनीय होईल, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगितले आहे. त्यानुसार राज्य सरकारने या विषयावर विचार केला आहे, असे समजते.