महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – मुंबई : देशभरात कोरोनानं धुडगूस घातल्यानंतर राज्य सरकारनंही सतर्कतेची पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. लॉकडाऊनच्या काळातील कर्मचाऱ्यांच्या अडचणी जाणून आता राज्य सरकार राज्यातील 12 लाख नोंदणीकृत कामगारांना दोन टप्प्यात पाच हजार रुपये देणार आहे. 22 मार्चपासून राज्यातील सर्वच उद्योग बंद असल्याने कामगार घरी परतले आहेत. या कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन द्यावे असे निर्देश सरकारने दिले आहेत.
मात्र, बहुतांश कामगारांना वेतन मिळालेले नसून काही कामगारांना ते मिळणार नसल्याचे उद्योगांनी स्पष्ट केल्याची चर्चा आहे. दरम्यान, राज्यातील कामगारांचे प्रश्न सोडवून त्यांना अपेक्षित लाभ मिळावा यासाठी राज्य सरकारने सुकाणू समिती स्थापन केली आहे. मात्र, या समितीचा अद्याप अभ्यास पूर्ण झाला नसल्याने समितीचा अहवाल सरकारकडे गेलेला नाही. दरम्यान, हातातील काम गेल्याने जगावे की मरावे असा प्रश्न पडलेल्या कामगारांनी हाताला काम द्यावे अथवा सरकारने मदत तरी करावी, अशी मागणी केली आहे.