राज्यात “या” ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.९ जून । आष्टी शहर व तालुक्याच्या बहुतांश भागांत बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास विजांचा कडकडाट, ढगांच्या गडगडाट व वादळी वाऱ्यासह पूर्वमोसमी जोरदार पाऊस झाला. तालुक्यात नांगरणी, शेणखत टाकणे, वखरणी आदी शेतीकामे पूर्ण झाली आहेत. पावसाचा शिडकावा वगळता रोहिणी नक्षत्र कोरडे गेले.

गेल्या आठवड्यापासून दुपारपर्यंत ऊन व त्यानंतर ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. प्रचंड उकाड्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. आजही प्रचंड उकाडा होता. दुपारी चारनंतर आकाशात ढगांची गर्दी होऊन सहाच्या सुमारास विजांचा कडकडाट, ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसास सुरवात झाली. सुमारे दीड तास कमी अधिक प्रमाणात झालेल्या पावसामुळे उंचसखल भागात पाणी साचले.

जालना : अंबड तालुक्यातील रोहिलागड, किनगाव परिसरात सायंकाळी वादळवाऱ्यासह पाऊस झाला. वादळामुळे किनगावात काही घरांवरची पत्रे उडाले. झाडे उन्मळली. विजेच्या तारा तुटल्या. सुखापुरीसह विविध भागांत पावसाने हजेरी लावली.

किल्लारी : किल्लारीसह परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह पूर्वमोसमी पाऊस झाला. वीज पडून मेंढपाळाचा मृत्यू झाला तर त्याच्या दोन शेळ्या दगावल्या. किल्लारी शिवारातील टोलनाक्याजवळ एकजण मेंढ्या चारत असताना सायंकाळी पाचच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला. पावसामुळे झाडाखाली थांबलेल्या लहू नागनाथ घोडके (वय ४८, रा. नदीहत्तरगा, ता. निलंगा) या मेंढपाळाचा वीज पडून मृत्यू झाला. दोन शेळ्या दगावल्या. किल्लारीचे सहायक पोलिस निरीक्षक सुनील गायकवाड, बिट जमादार गौतम भोळे, तलाठी आशा होळनूर यांनी पंचनामा केला.

परभणी : औरंगाबाद, जालना, बीड व परभणी जिल्ह्यांच्या काही भागात ९ जूनला वादळीवारा, विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागाचे मुख्य प्रकल्प समन्वयक डॉ. के. के. डाखोरे यांनी ही माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *