काळजी घ्या : पुण्यात करोनाबाधितांच्या संख्येत वाढ; चाचणी केंद्र वाढवणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.९ जून । शहरात करोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. बुधवारी शहरात १२१ नवबाधितांची नोंद झाली, तर शहरातील सक्रिय रुग्णसंख्या पाचशेवर पोहोचली आहे. मात्र, यातील बहुतांश रुग्णांना सौम्य लक्षणे जाणवत असून, गंभीर रुग्णांचे प्रमाण अत्यल्प असल्याचे महापालिकेतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. महापालिकेतर्फे करोना चाचणी केंद्रांची संख्या वाढवली जाणार आहे.

मागील तीन-चार महिने शहरातील करोनाबाधितांची संख्या घटली होती. सक्रिय रुग्णसंख्या ५०पेक्षाही खाली आली होती. महापालिकेने दैनंदिन बाधितांची आकडेवारी जाहीर करणेही थांबवले होते. मात्र, गेल्या आठवड्यापासून करोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे.

बुधवारी शहरात १२१ नवबाधितांची नोंद झाली. यातील १८ रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत, तर दोघांना ऑक्सिजन द्यावा लागत आहे. यातील बहुसंख्य रुग्ण सहव्याधीग्रस्त आहेत, तर शहरातील सक्रिय रुग्णसंख्याही पाचशेच्या वर गेली आहे.

‘रुग्णसंख्या वाढली असली, तरी सर्वांना सौम्य लक्षणे आहेत. येत्या काळात बाधितांच्या संख्येत आणखी थोडी वाढ दिसून येण्याची शक्यता आहे. मात्र, करोनाचे सौम्य स्वरूप आणि आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर झालेले लसीकरण यामुळे रुग्णालयात दाखल कराव्या लागणाऱ्या किंवा ऑक्सिजनची गरज भासणाऱ्या रुग्णांची संख्या कमी राहील,’ असे महापालिकेचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे यांनी सांगितले.

चाचणी केंद्रे वाढवणार
करोनाबाधितांची संख्या कमी झाल्यानंतर महापालिकेने करोना चाचणी केंद्रांची संख्या कमी केली होती. अलिकडेच त्यात आणखी घट केली होती. सध्या आठ केंद्रे सुरू होती. तिथे आणि शहरातील खासगी केंद्रांवर मिळून दररोज एकूण सुमारे १,५०० चाचण्या होत आहेत. महापालिकेतर्फे येत्या तीन दिवसांत आणखी दहा केंद्रे वाढविण्यात येणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *