IND vs SA 1st T20 : आजपासून रंगणार टी ट्वेंटीचा थरार, जाणून घ्या कशी असेल खेळपट्टी आणि संभाव्य संघ

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.९ जून । भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात होते. मालिकेतील पहिला सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. सामन्याच्या पूर्व संध्येला भारतीय संघाला दोन मोठे झटके बसले आहेत. कर्णधार के एल राहुल आणि फिरकीपटू कुलदीप यादव जखमी झाल्याने मालिकेतून बाहेर पडले आहेत. अशा स्थितीत भारतीय संघाचे नेतृत्व ऋषभ पंत करणार आहे तर दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व टेम्बा बावुमाकडे असणार आहे.

आकडेवारीचा विचार केला तर, भारत आणि दक्षिण आफ्रिकेचा संघ टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत एकूण १५ वेळा समोरासमोर आले आहेत. यामध्ये भारताने नऊ तर दक्षिण आफ्रिकेने सहा सामने जिंकले आहेत. या आकडेवारीचा विचार केला तर भारतीय संघाचे पारडे जड दिसत आहे. मात्र, घरच्या मैदानांवर भारताची दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कामगिरी फारशी चांगली नाही. आतापर्यंत भारतामध्ये दोन्ही संघ चारवेळा आपापसात लढले आहेत. यापैकी भारताला फक्त सामना जिंकण्यात यश आले आहे. तर, दक्षिण आफ्रिकेच्या संघाने तीन सामने जिंकले आहेत.

दिल्लीमध्ये अजूनही प्रचंड उष्णता आहे. या अर्थ सामन्याच्या सुरुवातीला हवा कोरडी असेल. खेळाडूंना काही काळ हवेतील उष्णतेचा सामना करावा लागू शकतो. पहिल्या डावानंतर मात्र, काही प्रमाणात दव पडण्याची शक्यता आहे. दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघाला याचा फायदा होऊ शकतो. शिवाय, टी ट्वेंटी सामन्यांमध्ये धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठलाग करण्याला जास्त प्राधान्य दिले जाते. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा कर्णधार प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.

दिल्लीच्या खेळपट्टीवर टी ट्वेंटी सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करून प्रतिस्पर्धी संघासमोर मोठे लक्ष्य ठेवणे आतापर्यंत शक्य झालेले नाही. शिवाय, आजची खेळपट्टी गोलंदाजांना कशाप्रकारे मदत करेल, यााबाबत अस्पष्टता आहे. तज्ज्ञांच्या मते, या खेळपट्टीवर आतापर्यंत झालेल्या टी ट्वेंटी सामन्यांमध्ये फिरकीपटूंनी चांगली कामगिरी केलेली आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात फिरकीपटूंवर सर्वांचे लक्ष असणार आहे.

दरम्यान, भारतीय संघ आजचा सामना जिंकून विश्वविक्रम करण्याचा प्रयत्न करेल. भारतीय संघाने आतापर्यंत सलग १२ आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी सामने जिंकले आहेत. आजचा सामना जर भारताने जिंकला तर हा सलग १३वा विजय ठरेल. सध्या भारत, अफगाणिस्तान आणि रोमानियासह संयुक्तपणे पहिल्या स्थानावर आहे.

दक्षिण आफ्रिका संघाच्या तुलनेत सध्या भारतीय संघामध्ये नवख्या खेळाडूंची संख्या जास्त आहे. शिवाय, भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि रवींद्र जडेजा यांना आगामी मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे नवीन खेळाडूंना हाताशी धरून संघाला विजय मिळवून देण्याची जबाबदारी कर्णधार ऋषभ पंत आणि उपकर्णधार हार्दिक पंड्या यांना पार पाडावी लागणार आहे.

संभाव्य भारतीय संघ : ऋतुराज गायकवाड, ईशान किशन, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (कर्णधार यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, युझवेंद्र चहल.

संभाव्य दक्षिण आफ्रिकन संघ : टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक(यष्टीरक्षक), रीझा हेंड्रिक्स, केशव महाराज, एडेन मार्करम, डेव्हिड मिलर, एनरिक नॉर्टजे, ड्वेन प्रिटोरियस, कागिसो रबाडा, तबरेझ शम्सी, रॅसी व्हॅन डर ड्युसेन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *