महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१३ जून । इंडोनेशियाने पामतेल निर्यातीवरील करकपातीची केवळ घोषणा केल्यानंतर जगभरात खाद्यतेलांचे दर उतरले आहेत. देशांतर्गत बाजारात खाद्यतेलाच्या १५ किलोच्या डब्याच्या किमतीत सरासरी १०० रुपयांची घट झाली आहे.
इंडोनेशियाने कर आणि लेव्ही मिळून प्रति टन सुमारे ८५ डॉलरची दरकपात करण्याचे जाहीर केले. परिणामी, जागतिक बाजारात पामतेलाची उपलब्धता वाढून अन्य तेलांची मागणी घटण्याची शक्यता आहे. इंडोनेशियाच्या करकपातीच्या केवळ घोषणेनेच जगभरात खाद्यतेलांचे दर उतरले आहेत. निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास दरात आणखी घट होऊ शकते.
भारत जगातील सर्वात मोठा पामतेल आयातदार देश आहे. इंडोनेशियाने पामतेल निर्यातीवर नियंत्रणे आणताच देशात खाद्यतेलाचे भाव भडकले होते. आता धोरणात बदल होताच त्याचे सकारात्मक परिणाम बाजारपेठेत दिसू लागले आहेत. देशातील खाद्यतेलाचे दर उतरू लागले आहेत. आता आणखी दर कमी होण्याची शक्यता आहे. सध्या १५ किलोच्या डब्याचे दर सरासरी १०० रुपयांनी उतरले आहेत. किलोमागे सरासरी ७-८ रुपये कमी झाले आहेत .