यंदाही कमी कालावधीत पाऊस सरासरी गाठणार का?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१३ जून । मुंबईमध्ये मान्सून दाखल झाल्याचे जाहीर झाल्यानंतर मान्सूनपूर्व सरींचे दोन दिवस आणि मान्सूनचा एक दिवस अशा तीन दिवसांमध्ये पावसाच्या आकडेवारीने कुलाबा येथे या मोसमातील १०० मिलीमीटर पावसाचा टप्पा ओलांडला आहे. गेले तीन दिवस सातत्याने संध्याकाळी हजेरी लावलेल्या पावसामुळे सांताक्रूझ येथेही अवघ्या तीन दिवसांत ८० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. दोन्ही केंद्रांवरची आकडेवारी ही आत्तापर्यंतच्या सर्वसाधारण सरासरीपेक्षा कमी आहे. तरी यंदाही कमी कालावधीत मुसळधार पाऊस हजेरी लावून सरासरी गाठणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

वातावरण बदलाच्या पार्श्वभूमीवर तीव्र वातावरणाची शक्यता जागतिक स्तरावर वर्तवण्यात आली आहे. गेल्या वर्षी मुंबईकरांनी कमी कालावधीत तीव्र पावसाच्या घटनांचा अनुभव घेतला. यंदा मान्सूनपूर्व सरी गायब असल्याने जून महिन्याच्या सुरुवातीला दोन ते तीन मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. मात्र त्यानंतर तीन दिवसांमध्ये कुलाबा येथे १००.२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. रविवारी सकाळी ८.३०पर्यंतच्या २४ तासांमध्ये कुलाबा येथे ३७.४ तर सांताक्रूझ येथे २३ मिलीमीटर पाऊस पडला. आत्तापर्यंतच्या सरासरी पावसापेक्षा कुलाबा येथे ३१.४ तर सांताक्रूझ येथे ५४.९ मिलीमीटर पावसाची तूट आहे. ८ जूनपर्यंतच्या माहितीनुसार सांताक्रूझ आणि कुलाबा दोन्ही ठिकाणी १०० टक्के पावसाची अनुपस्थिती होती. अवघ्या तीन दिवसांतील संध्याकाळी पडलेल्या पावसामुळे आता पावसाची उपस्थिती अशीच असणार का, असा प्रश्न मुंबईकरांना पडला आहे. सोमवारपासून पुढील चार दिवस मुंबईमध्ये हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यातही हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे. मात्र ठाणे जिल्ह्यात पुढील दोन दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मुंबईत पावसाने उपस्थिती लावल्याने तापमानातील बदलासोबतच प्रदूषणाच्या पातळीतही बदल झाला आहे. मुंबईतील प्रदूषणाचे प्रमाण कमी झाले आहे. पावसाळी हवेने प्रदूषके दूर झाली असून रविवारी सफर या प्रदूषण मापन यंत्रणेच्या माहितीनुसार मुंबईच्या हवेची गुणवत्ता चांगली होती. दिल्लीची वाईट तर पुणे आणि अहमदाबादची समाधानकारक होती. मुंबईच्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक हा २३ होता. मुंबईतील बहुतांश केंद्रांवर हवेची गुणवत्ता चांगली असल्याचीच नोंद झाली. सोमवारीही हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक चांगला असू शकतो.

येत्या २४ तासांमध्ये मान्सून कोकणाच्या उर्वरित भागात तसेच बहुतांश मध्य महाराष्ट्रात दाखल होईल. पुढील तीन दिवसांमध्ये मराठवाड्यातही मान्सून आमगनाची चिन्हे असल्याचे भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *