MLC Election: विधानपरिषद निवडणुकीत फडणवीसांनी सदाभाऊ खोतांना निवडून आणल्यास ठाकरे सरकार समोरील अडचणी वाढणार ?

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१३जून । राज्यातील विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा महाविकास आघाडी आणि भाजप एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांच्या कुशल रणनीतीच्या जोरावर भाजपने संख्याबळ नसूनही धनंजय महाडिक यांची तिसरी जागा निवडून आणली होती. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासाठी काहीच अशक्य नाही, असा आत्मविश्वास भाजपच्या गोटात आहे. देवेंद्र फडणवीस विधानपरिषद निवडणुकीतही असाच चमत्कार करुन भाजपच्या चारऐवजी सहा जागा निवडून आणतील, अशी चर्चा रंगली आहे. भाजपने पाच अधिकृत उमेदवार व सदाभाऊ खोत यांच्या रुपाने भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार विधानपरिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. ज्याअर्थी भाजपने या उमेदवारांना रिंगणात उतरवले आहे, त्याअर्थी फडणवीस आणि भाजपने त्यादृष्टीने तयारीही केली असेल, असे बोलले जाते. मात्र, विधानपरिषदेत भाजपच्या सहा जागा निवडून आल्यास हा ठाकरे सरकारसाठी सर्वात मोठा धोका असेल. कारण, असे घडल्यास ठाकरे सरकार आपसूकच अल्पमतात जाईल. (Vidhanparishad Election 2022)

भाजपचे संख्याबळ १०६ असून काही अपक्ष आमदार त्यांच्यासोबत आहेत. विधानपरिषदेत प्रत्येक आमदाराला निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीची २७ मते आवश्यक आहेत. या गणितानुसार, भाजपचे पहिले ४ उमेदवार सहज निवडून येतील. तर पाचव्या जागेवरील प्रसाद लाड यांना निवडून आणण्यासाठी काही मतांची तजवीज करावी लागेल. चार जागांसाठी १०८ मतांची गरज लागेल. त्यामुळे प्रसाद लाड यांना निवडून आणण्यासाठी आणखी २७ मतांची जुळवाजुळव भाजपला करावी लागणार आहे. पाचवी जागा जिंकण्यासाठी भाजपला १३० पेक्षा जास्त मतांची गरज लागेल. यामध्येच भाजपची बरीच दमछाक होईल. मात्र, यानंतरही देवेंद्र फडणवीस यांनी अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेल्या सदाभाऊ खोत यांना निवडून आणण्याची किमया घडवल्यास तो ठाकरे सरकारसाठी मोठा धक्का ठरेल. कारण, सहाव्या जागेसाठी भाजपला किमान १५० तरी मते लागतील. राज्यात सत्तास्थापनेसाठी मॅजिक फिगर अर्थात बहुमताचा आकडा हा १४४ इतका आहे. त्यामुळे विधानपरिषेदत सहावी जागा निवडून आणल्यास भाजप आपोआपच बहुमताचा आकडा गाठेल. गुप्त मतदान पद्धतीमुळे ही शक्यता आणखी वाढली आहे. त्यामुळे विधानपरिषदेची निवडणूक ही एका अर्थी ठाकरे सरकारची परीक्षा असेल, असे राजकीय जाणकारांकडून सांगितले जात आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *